भारत सरकारने एक विधेयक पास केलं आणि ऑनलाईन मनी गेमिंग अॅपचा बाजार उठला. यात भारतीय संघाला स्पॉन्सरशिप देणाऱ्या ड्रीम इलेव्हन कंपनीचं नावही आघाडीवर आहे. ड्रीम इलेव्हन कंपनीने 2023 मध्ये टीम इंडियाच्या जर्सीचे प्रायोजकत्व घेतले. पण ऑनलाईन गेमिंग कंपन्यांवर बंदी घातल्यावर ड्रीम 11 कंपनीला धक्का बसला आहे. ड्रीम 11 कंपनीने टीम इंडियासोबत 358 कोटी रुपयांचा जर्सीचा करार केला होता. तसेच या कंपनीने इतर जाहिरातींवर 2400 कोटी खर्च केले होते. पण सरकारच्या निर्णयानंतर बीसीसीआयने ड्रीम 11 सोबतचा करार मोडला आहे. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी एएनआयला सांगितले की, आतापासून ते अशा कंपन्यांशी कोणताही करार करणार नाहीत, कारण आता हे काम नवीन कायद्यानुसार योग्य मानले जाणार नाही. बीसीसीआयच्या जर्सी प्रायोजकत्वाची अशी स्थिती होण्याची ही काय पहिली वेळ नाही. यापूर्वी देखील कंपन्यांची अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे स्पॉन्सरशिपबाबत सोशल मीडियावर मीम्स व्हायरल होत आहे. 2001 पासून आतापर्यंत भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीला प्रायोजित करणाऱ्या प्रत्येक कंपनीला कोणत्या ना कोणत्या अडचणीचा सामना करावा लागला आहे.
सहारा ही भारतातील दिग्गज कंपन्यांपैकी एक होती. एक काळ या कंपनीने भारतात गाजवला आहे. त्या काळात या कंपनीने टीम इंडियाला प्रायोजकत्व दिलं होतं. सहाराने 2001 ते 2013 पर्यंत टीम इंडियाच्या जर्सीला स्पॉन्सरशिप दिली होती. पण जसा काळ पुढे लोटला तशी कंपनीची स्थिती नाजूक झाली आणि अस्तित्व संपून गेलं. सहारानंतर मायक्रोमॅक्स स्मार्टफोन कंपनीने प्रायोजकत्व स्वीकारलं. मायक्रोमॅक्सने 2014 ते 2016 पर्यंत टीम इंडियाला जर्सी स्पॉनरशिप दिली. पण मायक्रोमॅक्स कंपनीची स्थिती नाजूक झाली आणि मार्केटमधून बाहेर गेली. बायूज कंपनीची स्थितीही अशीच काहीशी झाली. 2019 ते 2023 पर्यंत भारतीय संघाच्या जर्सीचं प्रायोजकत्व स्वीकारलं. पण आर्थिक अनियमितेतमुळे कंपनीला घरघर लागली.
आशिया कप स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे टीम इंडिया कोण प्रायोजकत्व देत याची उत्सुकता आहे. कारण आता फारच कमी अवधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे ही उत्सुकता ताणली गेली आहे. क्रिकेट जर्सीवरील जाहिरातींसाठी एक मोठी बाजारपेठ आहे आणि अनेक कंपन्या त्यात रस घेतील, यात काही शंका नाही. पण कोणती कंपनी असेल याबाबत मात्र उत्सुकता आहे.