रविंद्र गायकवाड
बिडकीन : बिडकीन ते चितेगाव या प्रमुख महामार्गावर सोमवारी पुन्हा एकदा मोठी वाहतूक कोंडी झाली. तब्बल एक तासाहून अधिक काळ वाहनांची लांबलचक रांग लागल्याने प्रवाशांना, शालेय विद्यार्थ्यांना व व्यावसायिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. या कोंडीसाठी मुख्यत्वे जड वाहनांची बेफाम वाहतूक जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले असून, सर्वात धक्कादायक म्हणजे घटनास्थळी महामार्ग वाहतूक पोलिसांचा पत्ताच लागला नाही.
निलजगाव, सहयोग नगर, फारोळा व चितेगाव परिसरातून जाणाऱ्या या महामार्गावर दररोज सकाळ–संध्याकाळी वाहनांची गर्दी होते. आज मात्र वाहने तब्बल तीन तासांहून अधिक वेळ ठप्प राहिल्याने नागरिक त्रस्त झाले. शेतकरी, व्यापारी, शालेय बस, रुग्णवाहिका यांना या कोंडीचा मोठा फटका बसला.
दरम्यान, महामार्गावरील जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्णत्वाकडे जात असताना रस्त्याचे रुंदीकरण सुरू आहे. मात्र हे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून, पर्यायी मार्गांची कोणतीही व्यवस्था नसल्याने वाहनांच्या रांगा वाढत आहेत. परिणामी अपघाताचा धोका देखील निर्माण झाला आहे.
स्थानिक व्यापारी संघटना व नागरिकांनी या ठिकाणी महामार्ग पोलिसांची कायमस्वरूपी तैनाती करावी, जड वाहनांच्या वाहतुकीवर मर्यादा आणाव्यात, तसेच काम पूर्ण होईपर्यंत पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली आहे.
नागरिकांच्या प्रमुख मागण्याजड वाहनांच्या वाहतुकीवर तात्काळ नियमन
महामार्ग वाहतूक पोलिसांची कायमस्वरूपी तैनाती
पर्यायी मार्गाची तातडीने उपलब्धता
रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला गती
या सर्व समस्यांकडे संबंधित विभाग व प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास नागरिकांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.