नसरापूर, ता. २५ : भोर तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये कृषी वीज पंपांची मोटार चोऱ्यांचे सत्र सुरू आहे. पाण्याच्या मोटारी, त्यांच्या केबल आणि ट्रान्सफॉर्मर चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे.
१ ते २२ आॅगस्टदरम्यान पांडे येथे नीरा नदीकाठावरील किर्लोस्कर कंपनीची ४५ हजार रुपये किमतीची पाण्याची मोटर चोरट्यांनी लंपास केली आहे. याबाबत पांडुरंग सोपाना साळुंखे (वय ६५, रा. सावरदरे) यांनी राजगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
दरम्यान, वारंवार होणाऱ्या या चोरीमुळे शेतकऱ्यांचे सिंचन विस्कळित होत असून, आर्थिक नुकसानाचा भार वाढत आहे. चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. या चोरीबाबत पोलिस हवालदार मयूर निंबाळकर पुढील तपास करत आहेत.