माझगावचे एचएनसीआयआय रुग्णालय गरीब कर्करुग्णांसाठी आधार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : मुंबई महापालिका आणि डॉ. सुलतान प्रधान यांच्या कॅन केअर ट्रस्ट यांच्या भागीदारीत स्थापन झालेले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हेड अँड नेक कॅन्सर इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एचएनसीआयआय) रुग्णालय नुकतेच दोन वर्षांचे झाले. अल्पावधीतच हे रुग्णालय गरीब कर्करुग्णांसाठी मोठे दिलासादायी ठरले आहे. मागील दोन वर्षांत या रुग्णालयातील तब्बल ६० टक्के रुग्णांची ओपीडी मोफत करण्यात आली, तर डोके व मान कर्करोगाशी संबंधित १,४०० शस्त्रक्रिया फार कमी दरात पार पडल्या.
गेल्या दोन वर्षांत एकूण ५३,०१३ ओपीडी झाली असून, त्यापैकी ३०,७४२ रुग्णांना मोफत सेवा देण्यात आली. ६,९५२ शस्त्रक्रियांची नोंद झाली असून, त्यात १,४०० शस्त्रक्रिया ट्रस्ट किंवा कमी दरात करण्यात आल्या. तसेच ६,९४२ केमोथेरपी आणि १,१४२ रेडिएशन थेरपी उपचार देण्यात आले.
भारतामध्ये डोके व मान कर्करोगाचे प्रमाण गंभीर स्वरूपाचे असून, एकूण कर्करोग रुग्णांपैकी २७ ते ३० टक्के रुग्ण या आजाराने ग्रस्त आहेत. पाश्चात्त्य देशांत हे प्रमाण ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. दरवर्षी भारतात दोन लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळतात आणि त्याचे प्रमुख कारण तंबाखूचे सेवन असल्याचे डॉक्टरांचे निरीक्षण आहे.
वेळीच निदान झाल्यास रुग्णांचे प्राण वाचू शकतात. त्यासाठी डेंटिस्ट व ईएनटी तज्ज्ञांना प्रशिक्षण देऊन लवकर निदान करण्याची क्षमता वाढवणे गरजेचे आहे, असे डॉ. सुलतान प्रधान यांनी सांगितले.