मुंबई-गोवा महामार्गावरून भावनांचा उद्रेक
महामार्गाच्या दुरवस्थेबाबत समाजमाध्यमांवर टीका
पाली, ता. २५ (वार्ताहर)ः मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणात पळस्पे ते पत्रादेवीपर्यंत ४७१ किलोमीटर लांबीच्या महामार्गाचा समावेश आहे. या महामार्गाचे काम १८ वर्षे उलटूनही आजतागायत पूर्ण झालेले नाही. यंदा कोकणकरांचा जातानाच प्रवास निर्विघ्न झाला असला तरी परतीच्या प्रवासात मात्र खड्ड्यांमधून होणार असल्याने समाजमाध्यमांवर भावनांचा उद्रेक सुरू आहे.
पळस्पे ते इंदापूर ८४ किमीच्या पहिल्या टप्प्याचे काम आजतागायत पूर्ण झालेले नाही. इंदापूर ते कशेडी (७७ किमी) हा चौपदरीकरणाचा पुढील टप्पा आहे. या टप्प्यात अनेक विघ्न आहेत. कोकणवासीयांना महामार्गाचे चौपदरीकरण झाल्याचा आनंद झाला होता, पण परिस्थिती प्रत्यक्षात वेगळीच असून, अनेक वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम संथ गतीने सुरू असल्याने फेसबुक, इन्स्टाग्रामवर देत आहे.
ः--------------------------------------------
कोकणवासीयांची खदखद
- एक तर त्या ‘मुंबई-गोवा’ महामार्गाचा ‘राष्ट्रीय’ हा दर्जा काढून टाकून पायवाट म्हणून जाहीर करा... नाहीतर कोकणातल्या माणसांना ‘जनावरं’ म्हणून घोषित करा. टीप ः असा रस्ता जनावरांच्या नशिबी नको.
-----------------------------
- मला संधीवाताचा त्रास होता. माझी सर्व हाडे आखडून गेली होती. त्याचा खूप त्रास होत होता. डॉक्टरांना दाखवून पण काहीच फायदा झाला नाही. मग मुंबई-गोवा महामार्गाने माणगाव ते पनवेल प्रवास केला. अखडलेली सर्व हाडे मोकळी झाली आहेत. होय मी लाभार्थी, हे माझं सरकार…
--------------------------------
- कोणत्याही प्रकारच्या क्रेन किंवा अवजड साहित्य उचलण्याची कोणतीही साधन उपलब्ध नसताना इजिप्तमध्ये वाळवंटात २० ते २५ वर्षांत गिझासारखे पिरॅमिड उभे राहिले, पण सगळं असतानाही गेल्या १८ वर्षांत मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण झालेला नाही.
--------------------------
- गेल्या २५ वर्षांत सर्व पक्षीय राजकारण्यांसाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चरायचं कुरण म्हणून ठेवलेलं आहे, हे सगळं माहीत असूनही कोकणी माणूस त्याच नेत्यांना वारंवार निवडून देत आहे.