पुलाला झाडेझुडपांचा विळखा
दुरवस्थेबाबत आयुक्तांना पत्र; नवीन पुलासाठीही पाठपुरावा
कल्याण, ता. २४ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील ग्रामीण ‘अ’ प्रभागाला शहराशी जोडणाऱ्या एकमेव उल्हासनदीवरील ऐतिहासिक पुलाच्या दगडी कमानीलगत झाडेझुडपांनी विळखा घातल्याने पुलाची दुरवस्था होत आहे. त्यामुळे पुलाला धोका निर्माण होण्याची शक्यता असून, तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक दयाशंकर शेट्टी यांनी आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
पुलाचे बांधकाम एनआरसी कंपनीने १९४२ मध्ये स्टोन आर्च मेशेनरी ब्रीज प्रकारात केले असून, पुलाची लांबी १६० मीटर, रुंदी सात मीटर आणि उंची २५ मीटर इतकी आहे. हा पूल कल्याण शहरासह मोहने, आंबिवली, गाळेगाव, टिटवाळा आदी ग्रामीण भागांना जोडतो. पुलावरून पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिन्या जात असून, काही ठिकाणी कठडे तुटलेले आहेत. सध्या पुलाच्या कमानीलगत मोठ्या प्रमाणावर झाडे व झुडपे वाढले असून, यामुळे दगडी संरचनेला तडे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात ही वाढ अधिकच झपाट्याने झाल्यामुळे स्थिती गंभीर होत चालली आहे. संबंधित विभागाने या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट तीन वर्षांपूर्वी केले होते; मात्र त्यानंतर कोणतीही मोठी दुरुस्ती झाली नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. दयाशंकर शेट्टी म्हणाले, “पुलाच्या खांबांवर वाढलेली झाडेझुडपे ही संरचनेस धोका ठरू शकतात. त्यामुळे संभाव्य दुर्घटना होण्यापूर्वी स्ट्रक्चरल ऑडिट करून तातडीने कारवाई करावी, तसेच नवीन पुलाच्या कामाला गती द्यावी.”
नवीन पुलासाठी ६० कोटींचा प्रस्ताव
महापालिकेने नवीन पुलासाठी सुमारे ६० कोटींचा प्रकल्प प्रस्तावित केला असून, शासन स्तरावर त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. महापालिकेच्या शहर अभियंता अनीता परदेशी यांनी सांगितले की, “पावसाळ्यापूर्वी झाडाझुडपांची छाटणी करण्यात आली होती, मात्र पावसामुळे ती पुन्हा वाढली असतील. आता ती केमिकलच्या साहाय्याने नष्ट करून दुरुस्ती करण्यात येईल.