जगभरात दरवर्षी 26 ऑगस्ट या दिवशी महिला समानता दिवस (Women’s Equality Day ) हा साजरा केला जातो. तसं पहायला गेलं तर हा फक्त एक दिवस आहे, पण ही चळवळ महिलांनी त्यांच्या हक्कांसाठी लढलेल्या लढायांची आठवण करून देते. आजही या जगात महिलांशी संबंधित काही विचित्र आणि भेदभाव करणारे कायदे आहेत, ज्यांबद्दल वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.
महिला अर्ध्या साक्षीदार – येमेनच्या कायद्यात महिलांना ‘अर्धा साक्षीदार’ मानले जाते. याचा अर्थ येमेनमधील न्यायालयं ही महिलांची साक्ष पूर्ण मानत नाहीत. जर त्यांना पुरुषांचा पाठिंबा मिळाला नाही तर त्यांची साक्ष गांभीर्याने घेतली जात नाही.
पतीच्या संमतीशिवाय घटस्फोट नाहीच – इस्रायलमधील जेरुसलेम पोस्टनुसार, इस्रायलमधील कायदेशीर न्यायालये ज्यू कायद्याच्या आधारे चालतात. तिथे, ज्या महिला आपल्या पतींना घटस्फोट देण्याचा प्रयत्न करतात त्यांना प्रथम त्यांच्या पतींची परवानगी घ्यावी लागते. त्यांच्या परवानगी शिवाय त्यांना घटस्फोट मिळूच शकत नाही.
पुरूषी खेळांपासून दूर रहायचं – इराणमधील इस्लामिक धार्मिक नेत्यांनुसार, महिलांनी पुरुषांच्या खेळांपासून दूर रहावं. याच नियमामुळे तेथील महिला मैदानात जाऊन फुटबॉल सामने पाहू शकत नाहीत.
रशियामध्ये, महिलांना काही विशिष्ट नोकऱ्या (उदाहरणार्थ – मेट्रो ड्रायव्हर, जहाजांवर डेक वर्क, धोकादायक कारखान्यातील नोकऱ्या) करण्याची परवानगी नव्हती, परंतु 2021 साली यापैकी बरेच निर्बंध उठवण्यात आले आहेत.
मशीन दुरूस्त करू शकत नाहीत – पाकिस्तानमध्ये महिलांना मशीन दुरूस्त करण्याची परवानगी नाहीये. हा कायदा करणाऱ्या लोकांचा असा समज आहे की हे काम फक्त पुरूषच करू शकतात, त्यामुळे महिलांना या कामापासून दूर रहायला सांगितलं जातं.