गणेश विसर्जनासाठी १४३ कृत्रिम तलाव
इकोफ्रेंडली प्लॅस्टिकमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २६ : गणेशोत्सवाकरिता महापालिकेने शहरात १४३ कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती केली आहे. १५० दिवसांच्या कार्यक्रमांच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी विभागप्रमुखांच्या बैठकीत सविस्तर आढावा घेतला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार व डॉ. राहुल गेठे, शहर अभियंता शिरीष आरदवाड, प्रशासन विभागाचे उपआयुक्त भागवत डोईफोडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, अति. शहर अभियंता अरविंद शिंदे आणि इतर विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते.
गणेशोत्सव हा राज्य महोत्सव स्वरूपात साजरा करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार नवी मुंबई महापालिकेतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. त्यानुसार लोकसहभागातून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. गणेशोत्सव सुव्यवस्थित पार पडावा, याकरिता संबंधित विभागांनी आपल्याशी संबंधित कार्यवाही जबाबदारीने पार पाडावी, असे निर्देशित आयुक्तांकडून करण्यात आले आहे. तसेच गणेशोत्सवात करावयाच्या कामांची कार्यप्रणाली तयार करावी व प्रत्येक विभागाच्या कार्यकक्षा निश्चित कराव्यात, जेणेकरून प्रत्येक वर्षीच्या आयोजनासाठी सुयोग्य मसुदा तयार होईल, अशा सूचना आयुक्तांनी या वेळी दिल्या. गणेशमूर्ती विसर्जनासाठी नवी मुंबई महापालिकेने विविध विभागांमध्ये १४३ इतक्या मोठ्या संख्येने कृत्रिम विसर्जन तलाव तयार केले आहेत. न्यायालयाच्या निर्देशानुसार सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या मूर्ती कृत्रिम तलावातच विसर्जित करण्यात याव्यात याची काळजी घेण्यात यावी, असे आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले. तसेच इकोफ्रेंडली प्लॅस्टिकमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहनही विविध माध्यमांतून करण्याचे सूचित करण्यात आले आहे.