रजत पाटीदार याने काही महिन्यांपूर्वी त्याच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची अनेक वर्षांची प्रतिक्षा संपवली. रजतने आरसीबीला आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली. आरसीबीने अंतिम फेरीत पंजाब किंग्सचा पराभव करत आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं. त्यानंतर रजत पाटीदार याने दुलीप ट्रॉफी 2025 स्पर्धेत कडक सुरुवात केली आहे. रजतने दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील क्वार्टर फायनल मॅचमधील पहिल्याच दिवशी सेंट्रल झोन विरुद्ध वनडे स्टाईल शतक केलं आहे. रजतने अवघ्या 80 बॉलमध्ये 100 धावा पूर्ण केल्या. रजतने या दरम्यान चौफेर फटकेबाजी करत गोलंदाजांची धुलाई केली. रजतने शतकातील 100 पैकी 84 धावा या फक्त चौकार आणि षटकाराच्या माध्यामातून केल्या. रजतने शतकादरम्यान 18 चौकार आणि 2 षटकार लगावले.
दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील दुसऱ्या क्वार्टर फायनलचं आयोजन हे बंगळुरुत करण्यात आलं आहे. या सामन्यात सेंट्रल झोन विरुद्ध नॉर्थ इस्ट झोन आमनेसामने आहेत. नॉर्थ इस्ट झोनच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. नॉर्थ इस्ट झोनने सेंट्रल झोनला बॅटिंगसाठी भाग पाडलं. सेंट्रल झोनने पहिली विकेट झटपट गमावली मात्र त्यांनी पहिले बॅटिंगच्या संधीचा चांगला फायदा केला. आयुष पांडे याच्या रुपात टीमने पहिली विकेट गमावली. आर्यन जुआल 60 रन्सवर रिटायर्ड हर्ट झाला.
त्यानंतर रजत चौथ्या स्थानी बॅटिंगसाठी आला. रजत आणि दानिश मालेवार या दोघांनी वेगाने धावा केल्या. या दोघांनी विक्रमी भागीदारी केली. रजतने या दरम्यान वैयक्तिक शतक झळकावलं. रजतचा आयपीएल फायनंतरचा हा पहिलाच सामना आहे.
रजतला द्विशतकापर्यंत जाण्याची संधी होती. मात्र रजत पाटीदार शतकानंतर आणखी 25 धावाच जोडू शकला. रजतने 96 चेंड़ूत 130.21 च्या स्ट्राईक रेटने 125 धावा केल्या. रजने या खेळीत 21 चौकार आणि 3 षटकार लगावाले.
रजतची 18 व्या मोसमातील कामगिरीरजत पाटीदार याने आयपीएलच्या 18 व्या मोसमात नेतृत्वासह फलंदाजांची भूमिकाही चोखपणे बजावली. रजतने या हंगामातील एकूण 15 सामन्यांमध्ये 14 डावात 300 पेक्षा जास्त धावा केल्या. रजतने 24 च्या सरासरीने 312 धावा केल्या.
रजतची आंतरराष्ट्रीय कारकीर्दरजतला भारतीय संघाकडून खेळण्याची फारशी संधी मिळालेली नाही. रजतने भारताचं 3 कसोटी आणि 1 एकदिवसीय सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे.
दरम्यान रजतने या शतकी खेळीसह वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेसाठी दावा ठोकला आहे. टीम इंडिया मायदेशात ऑक्टोबरमध्ये विंडीज विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. तसेच बुची बाबू स्पर्धेत सर्फराज खान, पृथ्वी शॉ आणि ऋतुराज गायकवाड आणि इतर फलंदाजांनीही आपली छाप सोडली आहे. त्यामुळे निवड समितीसमोर विंडीज विरूद्धच्या मालिकेसाठी कुणाला संधी द्यायची? असा प्रश्न असणार आहे.