लंडन : गेल्या चार वर्षांत ब्रिटनमध्ये लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांत दोषी ठरणाऱ्या व शिक्षा सुनावण्यात येणाऱ्या परदेशी नागरिकांमध्ये भारतीय नागरिकांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे ब्रिटन सरकारच्या डेटावरुन समार आले आहे. २०२१ ते २०२४ दरम्यान ब्रिटनमध्ये भारतीयांनी लैंगिक अत्याचारात दोषी ठरविण्याच्या ७२ घटना घडल्या. भारतीयांना दोषी ठरवून शिक्षा सुनावण्याच्या घटनांत २५७ टक्क्यांनी वाढ झाली तर इतर परदेशी नागरिकांना अशा घटनांत शिक्षा ठोठावण्याचे प्रमाणही ६२ टक्क्यांनी वाढले.
ही आकडेवारी ब्रिटनच्या न्याय मंत्रालयाच्या डेटावर आधारित असून पोलिस नॅशनल कॉम्प्युटरकडून घेतलेल्या या डेटाचे स्थलांतर नियंत्रण केंद्र या विचारगटाकडून विश्लेषण करण्यात आले. ब्रिटनमध्ये लैंगिक अत्याचारात दोषी ठरणाऱ्या परदेशी नागरिकांच्या प्रमाणात ६२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०२१ ते २०२४ दरम्यानच्या या काळासाठी दोषी ठरविण्याच्या दरही ३९.३१ टक्क्यांनी वाढला आहे. नायजेरियांच्या नागरिकांमध्ये लैंगिक अत्याचारात दोषसिद्धीचे प्रमाण १६६ टक्क्यांनी वाढले आहे.
इराकी नागरिकांत ते १६० तर सुदानच्या नागरिकांत ११७ आणि अफगाणिस्तानच्या नागरिकांत ते ११५ टक्के एवढे वाढले आहे. भारताव्यतिरिक्त आशिया खंडातील बांगलादेश या यादीत सहाव्या क्रमांकावर असून चार वर्षांच्या काळात या देशातील नागरिकांचे लैंगिक अत्याचारातील प्रमाण १०० टक्क्यांनी वाढले असून पाकिस्तानींमधील प्रमाणातही ४७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०२१ ते २०२४ या कालावधीत गंभीर गुन्ह्यांतील शिक्षा ठोठावण्याच्या प्रकरणांत भारतीयांचा तिसरा क्रमांक आहे. या काळात अशा प्रकरणांत ११५ टक्क्यांनी वाढ होऊन ३१५ प्रकरणे अधिक झाली. केवळ गेल्या वर्षीच ५८८ प्रकरणे नोंदली गेली, जी २०२१ मधील २७३ प्रकरणांच्या दुप्पट आहेत.
याच काळात जवळपास ७५,००० परदेशी नागरिकांना गंभीर गुन्ह्यांत शिक्षा झाली असल्याचे सीएमसीच्या अहवालात नमूद केले आहे. या काळात अशा गुन्ह्यांत वाढ झाल्याचे सर्वसाधारण चित्र दिसून आले असून, शिक्षा ठोठावण्याच्या प्रकरणांत सातत्याने वाढ होत असल्याचे अहवालात अधोरेखित केले आहे. हिंसक गुन्ह्यांसह फसवणुकीच्या गुन्ह्यांत परदेशी नागरिकांना दोषी ठरविण्याचे प्रमाण कमी झाले आहे. यूके होम ऑफिसच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षात ब्रिटनमध्ये ताब्यात ठेवलेल्या भारतीयांची संख्या जवळपास दुपटीने वाढली आहे. भारतीयांना दिलेल्या स्टुडंट व्हिसांची संख्या ९८,०१४ असून ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तसेच, वर्क व टुरिस्ट व्हिसांच्या बाबतीत भारतीय नागरिक सर्वाधिक आहेत.
ब्रिटनमध्ये गुन्ह्यांत दोषी ठरणाऱ्या परदेशी नागरिकांना सहजपणे त्यांच्या मायदेशात परत पाठविता येईल, अशा देशांची संख्या वाढविण्यासाठी आम्ही राजनैतिक प्रयत्न करत आहोत. त्यांना शिक्षेविरोधात अपील करायचे असेल तर ते आपल्या देशातून करू शकतात.
- डेव्हिड लॅमी, परराष्ट्रमंत्री, ब्रिटन