आळंदी : पर्यावरण पूरक गणेश उत्सव आणि नदीतील जलप्रदूषण टाळण्यासाठी नगर परिषदेने आळंदी शहरात पाच ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र आणि विसर्जनासाठी पाच कृत्रिम हौद तयार ठेवले आहेत.
आळंदी शहरात सार्वजनिक गणेशोत्सव ता. २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत उत्साहात साजरा होणार आहे. दरवर्षी गणेशोत्सव काळात श्री गणेश मूर्तींचे विसर्जन इंद्रायणी नदीत केले जात असल्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होते व पर्यावरणावर त्याचा विपरीत परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर आळंदी नगर परिषदेने मागील एक तप पासून इंद्रायणी नदीत मूर्ती विसर्जनास मनाई केली आहे. यंदाही हीच भूमिका कायम ठेवून भाविक भक्तांसाठी शहरातील पाच ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे उभारण्यात आली आहेत.
भाविकांकडून जमा झालेल्या मूर्ती नगरपरिषदेकडून सुरक्षित पद्धतीने निश्चित ठिकाणी नेऊन विसर्जित केल्या जाणार आहेत. या संपूर्ण उपक्रमासाठी पाच पथकप्रमुख, सहाय्यक प्रमुख व एकूण ७५ कर्मचारी नियुक्त केले आहेत. तसेच प्रत्येक संकलन केंद्रावर निर्माल्य संकलनासाठी घंटागाड्या व ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच भाविकांच्या सुरक्षिततेसाठी इंद्रायणी घाटावर आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे.
दीड दिवसांच्या श्री गणरायाचे विसर्जन गुरुवारी (ता. २८) होणार आहे. तसेच त्यानंतर तीन, पाच, सात, नऊ, आकारा दिवसांच्या बाप्पांच्या मूर्तींचे विसर्जन इंद्रायणी नदीत न करता कृत्रिम हौदामध्ये करावे. शक्य तितक्या मूर्ती दान कराव्यात. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून सामाजिक जबाबदारी पार पाडावी.
- माधव खांडेकर, प्रशासक, तथा मुख्याधिकारी, आळंदी नगरपरिषद
या पाच ठिकाणी व्यवस्थावैतागेश्वर मंदिराजवळ
झाडी बाजार वाहनतळ
वाय जंक्शन
केंद्रे महाराज मठ
जुने नगरपालिका कार्यालय
या ठिकाणी कृत्रिम पाण्याचे हौद तयार करण्यात आले आहेत.