Nashik News : रेशन दुकानदारांना दिलासा; राज्य सरकारकडून कमिशनमध्ये क्विंटलमागे २० रुपयांची वाढ
esakal August 29, 2025 01:45 PM

नाशिक: राज्य शासनाने रेशन दुकानदारांना क्विंटलमागे वाढीव २० रुपये कमिशन लागू केले आहे. या निर्णयामुळे यापुढे प्रतिक्विंटलला १७० रुपये कमिशन मिळणार आहे. राज्यभरातील साधारणत: ५१ हजार रेशन दुकानदारांना या निर्णयामुळे फायदा होईल.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत शासन महिन्याकाठी अंत्योदय व प्राधान्य शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्य वितरित करते. महाराष्ट्रात अंदाजे सहा कोटी ८५ लाख लाभार्थ्यांना या धान्याचा लाभ मिळतो, पण हे धान्य वितरित करणाऱ्या रेशन दुकानदारांच्या वाढीव कमिशनचा मुद्दा अनेक महिन्यांपासून प्रलंबित होता.

वाढत्या महागाईच्या अनुषंगाने कमिशनमध्ये वाढ करताना वेळेत ते उपलब्ध व्हावे, अशी दुकानदारांची मागणी होती. अखेर राज्य मंत्रिमंडळाच्या १२ तारखेच्या बैठकीत रेशन दुकानदारांचे कमिशन १५० वरून १७० रुपये करण्यास मान्यता देण्यात आली; परंतु या निर्णयाच्या आदेशाची दुकानदारांना प्रतीक्षा लागून होती.

Train Robbery: तिरुपती साईनगर एक्स्प्रेसवर दरोडा; शस्राचा धाक दाखवून प्रवाशांचे दागिने लुटले, अनेकांचे मोबाइलही हिसकावले

गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला (ता. २६) शासनाने वाढीव कमिशनबद्दल आदेश काढले. त्यानुसार रेशन दुकानदारांना क्विंटलला १७०, तर टनाला एक हजार ७०० रुपये कमिशन मिळणार आहे. राज्यामध्ये अंदाजे ५१ हजार रेशन दुकानदार आहेत. तसेच नाशिक जिल्ह्यातील दोन हजार ६०८ रेशन दुकानदारांना त्यामुळे आर्थिक फायदा होईल. दरम्यान, वाढीव कमिशनमुळे शासनाच्या तिजोरीवर वार्षिक ९२.७१ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.