दादर पश्चिम रेलवे स्थानकात अनधिकृत फेरीवाले
esakal August 29, 2025 03:45 PM

दादर पश्चिम रेलवेस्थानकात अनधिकृत फेरीवाले
चेंबूर, ता. २८ (बातमीदार) ः दादर पश्चिम रेल्वेस्थानक परिसर अनधिकृत फेरीवाल्यांनी व्यापून गेला आहे. त्यामुळे स्थानकामधून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
दादर पूर्व व पश्चिम रेल्वेस्थानक हे मध्य व पश्चिम मार्गावरील महत्त्वाचे स्थानक म्हणून ओळखले जाते. दादरमध्ये फुल, फळ, कपडे, भाजीची होलसेल मार्केट असल्याने या स्थानकात लाखो विक्रेते, ग्राहक व प्रवासी दररोज प्रवास करतात.
दादर पश्चिम स्थानकाबाहेरील पदपथ व पुलाखालील जागेवर अनधिकृत फेरीवाल्यांनी कब्जा केला आहे. या अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिका कारवाई करते, मात्र जैसे थे परिस्थिती निर्माण होत असते. सध्या गणेश चतुर्थीनिमित्त दादरमधील बाजारात अनधिकृत विक्रेत्याची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या विक्रेत्यांना धंदा करण्यास पुरेशी जागा मिळत नसल्याने त्यांनी चक्क दादर पश्चिम रेल्वे मुख्य द्वार व जिन्यावर आपला मोर्चा वळविला आहे. त्यामुळे मध्य व पश्चिम रेल्वेस्थानकातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांची मोठी डोके दुःखी वाढली आहे. रेल्वेस्थानकपासून एकूण १५० मीटर अंतरापर्यंत फेरीवाल्यांना बसण्यास मनाई असतानाहीदेखील अनधिकृत फेरीवाले चक्क रेल्वेस्थानक परिसरात बसत असल्याने रेल्वे प्रशासनाबद्दल मोठा प्रश्न निर्माण होत आहे.
अनधिकृत फेरीवाल्यांवर तत्काळ कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रेल्वे प्रवासी सुरक्षा सेवा संघाचे अध्यक्ष ॲड. संतोष धोत्रे, ॲड. कपिल झोडगे, ॲड. विशाल गायकवाड यांनी दिला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.