Heavy Rain: उदगीर तालुक्यात पुन्हा अतिवृष्टीचा कहर; बोरगावात पुराचे पाणी शिरल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
esakal August 29, 2025 05:45 PM

उदगीर, (जि.लातुर) : शहर व परिसरात बुधवारी (ता.२७) रात्रीपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. तालुक्यातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत. जिल्ह्यात पुराचा फटका बसलेल्या उदगीर तालुक्यातील एकमेव बोरगावात पुन्हा पुराचे पाणी शिरल्याने नागरिकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

असाच पाऊस सुरू राहिल्यास पुन्हा या लोकांना बेघर होण्याची पाळी येणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या आठ दिवसापूर्वी बोरगाव येथे पुराचे पाणी गावात शिरल्याने जनावरे, कोंबड्या, शेळ्या-मेंढ्या वाहून गेल्या.

शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान झाले. घरात पाणी शिरल्याने अनेकांचे संसार उपयोगी साहित्य वाहून गेले. जीवित हानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाल्याचे पंचनामे प्रशासनाने केले आहेत. त्यांना अद्याप शासकीय मदत मिळते न मिळते तेच पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होऊन पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होण्याकडे वाटचाल सुरू झाली असल्याने या गावातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या बोरगावात पाणी शिरले असून घराच्या अंगणापर्यंत पाणी गेले आहे. प्रशासकीय यंत्रणा तातडीने बोरगावला रवाना झाली असून मंडळ अधिकारी, तलाठी, ग्राम विकास अधिकारी, वैद्यकीय पथक व आपत्कालीन मदत पथकही गावात पोहोचले आहे. धडकनाळ बोरगावच्या पुलावरून पाणी वाहत आहे. नदी पात्र सोडून वाहत असल्याने गावात पाणी आले आहे.

या नदीवर असलेले बंधारे, झाडे झुडपे, प्रवाहात येत असलेले विविध अडथळे दुर करण्यात आले आहेत. त्यामुळे नदीपात्रातून पाणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे यापूर्वी बंधाऱ्याची गेट बंद असल्याने झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात वाढल्याने पाणी तुंबून गावात आले होते यावेळी शक्यतो पाणी घरात शिरणारण्याची शक्यता कमी आहे.

Maratha Reservation: मराठा आरक्षण आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे सहभागी होऊन दिला पाठिंबा

पावसाचे प्रमाण व त्यामुळे निर्माण होणारी परिस्थिती याकडे प्रशासन लक्ष ठेवुन आहे.प्रशासन सद्या गावात पोहचले असल्याची माहिती तहसीलदार राम बोरगावकर यांनी दिली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.