Weather Update : लातूरमध्ये आज शाळांना सुट्टी, पावसाचा धुमाकूळ, 50 रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद
Saam TV August 29, 2025 07:45 PM
  • लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

  • रेणा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

  • पिकांचे नुकसान, ५० हून अधिक रस्ते वाहतुकीसाठी बंद

  • जिल्ह्यातील शाळांना सुट्टी, प्रशासनाची नागरिकांना सूचना

लातूर जिल्ह्यात काल पहाटेपासून मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक नदी-नाल्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे. वडवळ नागनाथ, तेलगाव, शिरूर अनंतपाळ, निलंगा या भागात पावसाने कहर केला असून नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यात लेंडी नदीच्या उपनदीला पूर आला आहे. परिणामी धडकनाळ व बोरगाव या गावांमध्ये पाणी शिरले असून उदगीर-देगलूर रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील अनेक गावांचा रस्ते संपर्क तुटल्याने नागरिक अडचणीत आले आहेत. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील घरणी नदीलाही पूर आल्याने शिरूर अनंतपाळ-धामणगाव मार्ग पाण्याखाली गेला आहे. यामुळे नागेवाडी, कारेवाडी, बोळेगाव आदी गावांचा संपर्क खंडित झाला आहे.

Latur Rain Alert : लातूर जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा; रात्रीपासून पावसाची संततधार, जनजीवन विस्कळीत

लातूर जिल्ह्यातील रेणा प्रकल्पामध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढते आहे. त्यामुळे प्रशासनाने धरणाचे दोन दरवाजे १० सेंटीमीटरने उघडून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यास सुरुवात केली आहे. या विसर्गामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Latur: मिरवणुकीदरम्यान बैल अचानक उधळला, ग्रामस्थ सैरावैरा पळू लागले; VIDEO व्हायरल

हवामान खात्याने लातूर जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व प्रमुख नद्या आणि ओढे तुडुंब भरले आहेत. जिल्ह्यातील ६० महसूल मंडळांपैकी तब्बल ३० मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. परिणामी जिल्ह्यातील ५० हून अधिक रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. शाळकरी मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आज जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Latur News : त्रास मुतखड्याचा उपचार किडनीचा; डॉक्टरांनी परस्पर किडनीच काढली रुग्णाचा दावा

दरम्यान महाराष्ट्रभर पडणाऱ्या पावसाने लातूरमध्ये धुमाकूळ घातला आहे. पुढील २४ तास हे लातूर जिल्ह्यासाठी अतिशय निर्णायक ठरणार असून पावसाचा जोर कायम राहिल्यास पूरस्थिती आणखी भीषण होण्याची शक्यता आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.