दुग्ध उद्योग १२.३५ टक्क्यांच्या सीएजीआरने वाढतोय ः कुंभार
esakal August 29, 2025 10:45 PM

आळेफाटा, ता. २९ ः ‘‘भारताचा दुग्ध उद्योग २०३३ पर्यंत अंदाजे ५७,००१.८ अब्ज रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. जो १२.३५ टक्क्यांच्या सीओजीआरने वाढत आहे. या वाढीमुळे पशुपालकांना दूध उत्पादन वाढवण्यासाठी आणि दुग्धजन्य पदार्थांच्या वाढत्या मागणीचा फायदा घेण्यासाठी संधी निर्माण होतील व या करिता किफायतशीर गोपालन गरजेचे आहे,’’ असे प्रतिपादन डॉ. उमेश कुंभार यांनी व्यक्त केले
राजुरी (ता. जुन्नर) येथील गणेश सहकारी दूध व्यवसायिक संस्था, गणेश मेडिकल, एम.एस. डी. इंटरवेट इंडियाप्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने जनावरांतील सामान्य समस्या व त्यावरील उपाय वंदत्व निवारण प्रजनन संस्थेचा विकास व गर्भधारणे संबंधी उपाय योजना या विषयावर दूध गवळ्यांना व्याख्यानांचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी कुंभार बोलत होते.
पुढे बोलताना कुंभार म्हणाले की, ‘‘जुन्नर तालुक्यात शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जात असून, दुग्ध व्यवसाय करताना गायींची योग्य पद्धतीने निगा राखून प्रोटीनयुक्त खाद्य दिल्यास दूध उत्पादनात चांगली वाढ होऊ शकते.’’
याप्रसंगी गणेश सहकारी दूध संस्थेचे अध्यक्ष सुभाष औटी, उपाध्यक्ष दिलीप घंगाळे, गोविंदराव औटी, बाळासाहेब हाडवळे, तुकाराम डुंबरे, अमर ऐतलवार, रोहित हंगे, जयंत गोरे, साईनाथ हाडवळे, रंगनाथ औटी, ज्ञानेश्वर घंगाळे, सुप्रिया औटी, विक्रम डुंबरे, संजय औटी, नीलेश हाडवळे, डॉ. संजय देवकर, डॉ. जब्बार शेख, डॉ. योगेश औटी, डॉ. श्रीधर बढे, डॉ. प्रकाश वामन, डॉ. जाधव, अजय पवार आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहन हाडवळे यांनी केले. गंगाराम औटी यांनी सूत्रसंचालन, तर निवृत्ती हाडवळे यांनी आभार मानले.

06928

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.