Complan बनवणारी कंपनी पहिल्यांदाच करणार स्टॉक स्प्लिट, रेकॉर्ड तारीख सप्टेंबरमध्ये
मुंबई : ग्राहकोपयोगी वस्तू कंपनी झायडस वेलनेस लिमिटेड आपल्या शेअर्सचे विभाजन म्हणजेच स्टाॅक स्प्लिट करणार आहे. Zydus Wellness ने आपल्या पहिल्या stock split ची घोषणा केली आहे. झायडस वेलनेसने १:५ च्या प्रमाणात एक शेअर विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
रेकॉर्ड तारीख
Zydus Wellness ने म्हटले की, १० रुपये दर्शनी मूल्याचा शेअर आता ५ शेअर्समध्ये विभागला जाईल, ज्याचे दर्शनी मूल्य प्रति शेअर २ रुपये असेल. कंपनीने ३० जुलै रोजी एक्सचेंज फाइलिंगमध्ये हा निर्णय जाहीर केला. कंपनीने आता १८ सप्टेंबर २०२५ ही stock split साठी रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केली आहे. याचा अर्थ असा की ज्या गुंतवणूकदारांकडे या तारखेपर्यंत कंपनीचे शेअर्स आहेत त्यांनाच या स्टॉक स्प्लिटचा फायदा घेता येईल. गुंतवणूकदारांनी हे लक्षात ठेवावे की T+1 सेटलमेंट नियमामुळे रेकॉर्ड तारखेच्या किमान एक दिवस आधी म्हणजे १७ सप्टेंबर २०२५ पर्यंत शेअर्स खरेदी करणे आवश्यक आहे.
शेअर किंमत
झायडस वेलनेसचा शेअर्स गुरुवारी वधारून २,०२७ रुपयांवर बंद झाला. कंपनीचे मार्केट कॅप १२,८०३.७४ कोटी रुपये आहे. शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक २,३४२.९० रुपये आणि निचांक १,४९३ रुपये आहे.
स्टॉक स्प्लिट म्हणजे काय?
स्टॉक स्प्लिट म्हणजे कंपनी तिच्या एका शेअर्सचे अनेक भाग करते. यामुळे शेअर्सची संख्या वाढते, परंतु कंपनीचे एकूण बाजार मूल्य तेवढेच राहते. याचा फायदा असा आहे की शेअरची किंमत तुलनेने कमी होते आणि गुंतवणूकदारांसाठी अधिक सुलभ होते.
निव्वळ नफा
जून २०२५ तिमाहीत कंपनीने ८६३.९० कोटी रुपयांचे एकत्रित एकूण उत्पन्न नोंदवले आहे, जे मागील तिमाहीच्या ९१३.९० कोटी रुपयांच्या एकूण उत्पन्नापेक्षा ५.४७% कमी आहे आणि गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या ८४६.०० कोटी रुपयांच्या एकूण उत्पन्नापेक्षा २.१२% जास्त आहे. कंपनीने तिमाहीत १२७.९० कोटी रुपयांचा करपश्चात निव्वळ नफा नोंदवला आहे.
कंपनीबद्दल
झायडस वेलनेस ही अहमदाबाद येथे मुख्यालय असलेली भारतीय ग्राहकोपयोगी वस्तूंची कंपनी आहे. ही झायडस लाइफसायन्सेस या औषध कंपनीची उपकंपनी आहे. तिच्या ब्रँडमध्ये ग्लुकॉन-डी, शुगर फ्री, एव्हरयुथ, कॉम्प्लान आणि नायसिल यांचा समावेश आहे.