IPO Listing : आयपीओचे लिस्टिंग फायदेशीर, पण नफावसुलीने शेअर्स कोसळला, लागले लोअर सर्किट
मुंबई : एआरसी इन्सुलेशनच्या आयपीओचे आज एनएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर समाधानकारक लिस्टिंग झाले. कंपनीचा शेअर्स एनएसई एसएमईवर १४५ रुपयांवर सूचीबद्ध झाला. आयपीओमध्ये प्रति शेअर किंमत १२५ रुपये होती. म्हणजेच ARC Insulation IPO गुंतवणूकदारांना १६% लिस्टिंग फायदा मिळाला. मात्र, त्यानंतर शेअर्स घसरल्याने आयपीओ गुंतवणूकदारांचा आनंद काही वेळातच मावळला. घसरणीनंतर शेअर्स १३७.७५ रुपयांच्या लोअर सर्किटवर आला. म्हणजेच आयपीओ गुंतवणूकदार आता १०.२०% नफ्यात आहेत.
१८.७१ पट सबस्क्राइब
ARC Insulation चा ४१.१९ कोटी रुपयांचा आयपीओ २१-२५ ऑगस्ट दरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला होता. या आयपीओला गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आणि एकूण १८.७१ पट सबस्क्राइब झाला. यामध्ये पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव असलेला भाग (QIB) १५.१२ पट, बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांचा (NII) २६.८४ पट आणि किरकोळ गुंतवणूकदारांचा भाग १७.२७ पट सबस्क्राइब झाला.
इतक्या शेअर्सची विक्री
आयपीओमध्ये ३८.०६ कोटी रुपये किमतीचे नवीन शेअर्स जारी करण्यात आले आहेत. याशिवाय, ऑफर फॉर सेल अंतर्गत २.५० लाख शेअर्स विकले गेले आहेत. ऑफर फॉर सेलचे पैसे शेअर्स विकणाऱ्या भागधारकांना मिळाले आहेत. नवीन शेअर्सद्वारे उभारलेल्या पैशांपैकी ८.१६ कोटी नवीन उत्पादन युनिटसाठी फॅक्टरी शेड उभारण्यासाठी, ३.०६ कोटी नवीन कार्यालय खरेदी करण्यासाठी, १.१८ कोटी कर्ज कमी करण्यासाठी, १६.३५ कोटी रुपये कार्यरत भांडवलाच्या आवश्यकतांवर आणि उर्वरित पैसे सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी खर्च केले जातील.
ARC इन्सुलेशन बद्दल
सप्टेंबर २००८ मध्ये स्थापन झालेले ARC इन्सुलेशन अँड इन्सुलेटर्स उच्च-कार्यक्षमता असलेले ग्लास फायबर रिइन्फोर्स्ड पॉलिमर (GFRP) कंपोझिट उत्पादने तयार करते. कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये टिकाऊ आणि हलके GFRP बार, ट्यूब, ग्रेटिंग्ज आणि फेसिंग समाविष्ट आहेत. त्यांची उत्पादने पायाभूत सुविधा, वीज, कूलिंग टॉवर्स, रसायने, कंपोझिट्स, इलेक्ट्रिकल सबस्टेशन्स, खाणकाम इत्यादींमध्ये वापरली जातात. उत्पादन युनिट पश्चिम बंगालमधील परगणा दक्षिणेतील रामदेवपूर गावात आहे.
निव्वळ नफा
२०२३ च्या आर्थिक वर्षात कंपनीचा निव्वळ नफा २.६४ कोटी रुपये होता, जो पुढील आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ६.१० कोटींवर पोहोचला आणि २०२५ च्या आर्थिक वर्षात ८.५७ कोटींवर पोहोचला. या कालावधीत, कंपनीचे एकूण उत्पन्न वार्षिक १६% पेक्षा जास्त चक्रवाढ वाढीच्या दराने (CAGR) वाढून ३३.१५ कोटींवर पोहोचले.