उर्गेन संघरक्षित यांना सिंधुदुर्गात अभिवादन
esakal August 29, 2025 01:45 PM

N87690

उर्गेन संघरक्षित यांना सिंधुदुर्गात अभिवादन
जन्मशताब्दी वर्ष सोहळाः बांदा, कणकवली, पावशीत विविध कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २८ः त्रिरत्न बौद्ध महासंघ या जागतिक बौद्ध महासंघाचे संस्थापक पूज्य उर्गेन संघरक्षित यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून मंगळवारी (ता. २६) सिंधुदुर्गात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. बांदा, कणकवली तसेच पावशी येथे हे कार्यक्रम पार पडले.
बांदा येथील प्रवचनामध्ये धम्मचारी सुचिवीर यांनी उर्गेन संघरक्षित व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्म दृष्टीत साम्यता असल्याचे स्पष्ट करत बाबासाहेबांना अभिप्रेत असणारा धम्मसेवक संघरक्षित यांनी त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या मार्फत धम्मचारी घडवून निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तसेच या बौद्ध संघाची वाटचाल बाबासाहेबांनी दिलेल्या दहा कलमी संहितेनुसार असल्याचे व्यक्त केले. कणकवली येथे झालेल्या कार्यक्रमात संघरक्षित यांना अभिवादन करताना धम्ममित्र सिद्धार्थ तांबे यांनी त्यांच्या जीवनचरित्रावर आपल्या प्रवचनातून भाष्य केले.
पावशी (ता. कुडाळ) येथे आयोजित केलेल्या धम्ममित्र कार्यशाळेत मार्गदर्शन करताना धम्मचारी जीनचीत्त यांनी उर्गेन संघरक्षित यांनी दिलेल्या पाच मूलभूत शिकवणीचा उहापोह करताना ते म्हणाले, व्यक्ती होण्यासाठी परिणामकारक शरण गमन करणे म्हणजेच बुद्ध, धम्म व संघ यांना प्रतिज्ञाबध्द होणे होय. त्यासाठी सखोल कल्याणमित्रतेची आवश्यकता आहे व आपल्या सम्यक अजिविकेनुसार इतरांना दुःखातून मुक्त करण्याचा बोधिसत्वाचा आदर्श घेऊन त्याप्रमाणे आचरण केल्यास श्रोतापन्ना अवस्था म्हणजेच उच्च मानवी अवस्था मनुष्य प्राप्त करू शकतो, मत व्यक्त केले.
या कार्यशाळेत कणकवली, बांदा, वेंगुर्ले, पावशी येथून २५ धम्ममित्र उपस्थित होते. सूत्रसंचालन धम्मचारी लोकदर्शी यांनी केले. आभार अमोल पावसकर यांनी मानले. या सर्व कार्यक्रमांत धम्मचारी तेजबोधी, गोवा येथील धम्मचारी सुचिरक्षित, धम्माचारिणी यशोमती, धम्मचारी अमृतसागर, दिगंबर पावसकर, शांताराम असणकर, अनंत पावसकर, किशोर यादव, कसवण तळवडे सरपंच मिलिंद सर्पे, कांता जाधव, बाळकृष्ण जाधव, नीलेश कदम, विजय तांबे, सिध्दार्थ कांबळे, अभय पावसकर, कृष्णा कदम, सीमा कांबळे, नीता तांबे, श्रद्धा असणकर, नीलम जाधव, हेमांगी कदम, संबोधी पावसकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.