चेतन व्यास
वर्धा : यंदाच्या हंगामात पावसाने शेतकऱ्यांना चांगलेच हैराण करून सोडले आहे. जिल्ह्याच्या काही भागात काहीवेळ ढगफुटी सदृश्य पाऊस पडत आहे. यातच वर्धा जिल्ह्यातील अनेक भागात पुन्हा एकदा जोरदार पाऊस झाला आहे. तर कारंजा तालुक्यातील धावसा शिवारात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेती पूर्णपणे खरडून गेल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. संत्रा बागांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
मागील आठवड्यात वर्धाजिल्ह्यातील आष्टी तालुक्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. यानंतर काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. यानंतर पुन्हा एकदा सोमवारी कारंजा तालुक्यातील धावसा येथे असाच दोन तास मुसळधार पाऊस पडला. यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. अवघ्या दोन तासांच्या पावसामुळे शेती पूर्णतः खरडून गेली असून कापूस, सोयाबीन पिकांसह सांत्र्यांची झाडे कोलमडून पडली आहे.
Akot Heavy Rain : बळीराजावर संकट! अकोल्याच्या पुंडा परिसरात ढगफुटी सदृश पाऊस; शेतकऱ्यांचे अतोनात नुकसाननुकसान भरपाईची मागणी
धावसा येथे सोमवारी संध्याकाळी मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे अक्षरशः शेतकऱ्यांच्या शेताचे बांध फुटून पिकांवर गाळ साचला आहे. शेतकऱ्यांची सोयाबीन, कापूस पिके हे पूर्णपणे ध्वस्त झाली आहे. तर संत्रा बागेचे सुद्धा नुकसान झाले आहे. इतके नुकसान झाले असताना देखील अद्याप प्रशासनकडून नुकसानीची कोणतीच दखल घेण्यात आली नाही. प्रशासनाने तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जातं आहे.
समुद्रपूर तालुक्यातही पावसाचा फटका
जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात देखील जोरदार पावसाने फटका दिला आहे. यात तालुक्यातील ताडगाव, मंगरूळ शिवाराला पावसाचा फटका बसला असून लाल नाला नदीला आलेल्या पुराचे पाणी शेतात शिरले आहे. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर नदीच्या काठावर असलेल्या शेतातील कपाशीसह इतर पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले असून पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.