पिंपरी, ता.२८ ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, महानगरपालिका व कलारंजन सांस्कृतिक संस्था यांच्या संयुक्त सोहळ्यात ज्येष्ठ साहित्यिक तानाजी एकोंडे यांना सन्मानित करण्यात आले.
अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सोहळ्यात साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या साहित्यिकांना सन्मानचिन्ह, रोख रक्कम, ग्रंथ व शाल देऊन गौरविण्यात आले. चाळीस वर्षांपेक्षा अधिक साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रात सेवा देणारे कामगार व शिक्षक एकोंडे यांना ‘साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे साहित्य पुरस्कार’ देण्यात आला. कलारंगचे संस्थापक तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी साहित्यिकांचा गौरव केला. जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब रसाळ, अनिल सौंदळे, मनोज सूर्यवंशी, अशोक गोरे, साहित्य संवर्धन समितीचे अध्यक्ष सुरेश कंक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.