Shoumika Mahadik : शौमिका महाडिकांना हसन मुश्रीफांचे आवाहन, गोकुळ दूध संघाच्या कारभारावर एकमेकांवर टीका; तर..'महायुतीमध्ये मिठाचा खडा'
esakal August 30, 2025 01:45 AM

Gokul Dudh Sangh Controversy : ‘गोकुळ’च्या कारभाराविषयी संचालिका शौमिका महाडिक यांच्या प्रश्नांचे निरसन करण्याची जबाबदारी संघाचे अध्यक्ष, संचालक व अधिकाऱ्यांची आहे. महायुतीचा अध्यक्ष झाल्यानंतर आपण स्वतःहून आचारसंहिता घालून घेतली पाहिजे. गेल्या निवडणुकीपेक्षा ही निवडणूक वेगळी आहे. महायुती म्हणून सर्वांनीच एक लक्ष्मणरेषा आखून घेतली पाहिजे. नाहीतर महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकल्यासारखे होईल’, अशा शब्दांत मंत्री हसन मुश्रीफ यांनी शौमिका महाडिक यांना सुचित केले. श्री. मुश्रीफ यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले, ‘शौमिका महाडिक आणि आमच्या मनात काय शंका आहेत, होत्या हेच जर बोलत बसलो, तर मतभेद वाढतच राहतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके आणि आपण होतो. यावेळी चेअरमन निवडीचा निर्णय झाला आहे. त्याचवेळी मी सांगितले होते की, तीन-चार तालुक्यांतील जागा रिक्त आहेत, त्या कायद्याप्रमाणे वाढविता येतात. त्या वाढविल्या पाहिजेत.’

मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, ‘दहीहंडीच्या कार्यक्रमात‘गोकुळ’ मधील वासाच्या दुधाबाबत खासदार धनंजय महाडिक यांनी काय वक्तव्य केले हे मला माहीत नाही. त्यांचे भाषण संपल्यानंतर मी कार्यक्रमाला आलो. बामणीच्या कार्यक्रमात मी वासाच्या दुधाबाबत उत्पादकांच्या मनातील शंकाचे निरसन झाले पाहिजे, असे म्हटलो होतो. यात वासाचे दूध परत देण्याची मागणी उत्पादकांची आहे. संघाच्या म्हणण्यानुसार हे दूध परत देता येत नाही, ते नष्ट केले पाहिजे.

Gokul Dudh Sangh Kolhapur : गोकुळ दूध संघाच्या संचालकांवर कारवाई का केली नाही?, याचिकेवर सर्किट बेंचचे निर्देश; अधिकाऱ्यांना नोटीस

सीपीआरमधील औषध घोटाळ्याबाबत ते म्हणाले, ‘हे प्रकरण २०२२-२३ सालातील आहे. बनावट दरपत्रक सादर करून ही खरेदी झाली होती. याप्रकरणी संबंधित कंपनीला ब्लॅकलिस्ट करून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे हे फेब्रुवारी २०२४ मध्ये हजर झाले, त्यामुळे त्यांच्याचा या प्रकरणाशी संबंध नाही.’

विरोधक कोण तुम्हाला माहीत...

‘आम्ही महायुतीत एकत्र आहोत, विरोधक कोण हे तुम्हालाही माहीत आहे, त्यांचे नाव घेण्याची गरज नसल्याचे मुश्रीफ यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. आमदार सतेज पाटील यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले, ‘आमच्यात शाब्दीक युद्ध वगैरे काहीही नाही. राहुल पाटील व राजेश पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या निर्णयानंतर आमदार पाटील यांनी त्यांना डिवचणारी वक्तव्ये केली केली. त्यानंतर मी फक्त त्यांना एवढाच सल्ला दिला की, इतकं हळवं होण्याची गरज नाही.’

संघाला अपशकुन करू नये

मुश्रीफ म्हणाले, ‘गोकुळ’च्या टेस्ट ऑडिटमधून काहीही निष्पन्न झालेले नाही, याची माहिती सर्किट बेंचमध्ये गेलेल्यांना नसावी. जाजम, घड्याळ खरेदी योग्य प्रकारे झाली आहे. संघाने त्याचे स्पष्टीकरण दिले आहे. संघ राज्यात ब्रँड बनत आहे, त्याला कोणी अपशकून करू नये. संघाच्या कारभारात निश्चितच सुधारणा झाली आहे. काही प्रमाणात लोकांच्या तक्रारी, शंका आहेत. परंतु, ९० टक्के तरी दुरुस्ती झालेली आहे.’

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.