महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अपघातांची मालिका सुरु आहे. त्यातच आता मराठवाड्यातील जाफराबाद तालुक्यात एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जाफराबाद-राजूर रस्त्यावर असलेल्या गाडेगव्हाण फाट्याजवळ एक कार विहिरीत कोसळून हा अपघात घडला. या अपघातात ठार झालेल्या सर्व पाचही जणांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोकरदन तालुक्यातील कोपरडा गावातून हे सर्व जण छत्रपती संभाजीनगर येथील सुलतानपूरकडे निघाले होते. एका रुग्णाला उपचारासाठी घेऊन जात असताना पहाटे ५ ते ६ च्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटले. भरधाव वेगाने येणाऱ्या कारने रस्त्यालगत मॉर्निंग वॉक करणाऱ्या एका व्यक्तीला धडक दिली. त्यानंतर कार थेट विहिरीचा कठडा तोडून सुमारे 70 फूट खोल विहिरीत कोसळली.
विहिरीमध्ये सुमारे 60 फूट पाणी असल्याने कारमधील पाचही जणांचा बुडून मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलीस, भोकरदन अग्निशमन दल आणि स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करून विहिरीतील पाणी उपसून मृतदेह बाहेर काढण्यात आले.
अपघातातील मृतांची नावे:
या अपघातात मृत्यू झालेले सर्व जण एकमेकांचे नातेवाईक होते. त्यांची नावे खालीलप्रमाणे:
ज्ञानेश्वर डकले
पद्माबाई भांबीरे
निर्मलाबाई डकले
आदिनाथ भांबीरे
ज्ञानेश्वर भांबीरे
या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.