मंगळवेढा - गणेशोत्सव दरम्यान आयोजित मिरवणुकीसाठी डि.जे. व लेझर लाईट वापरावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बंदीचे आदेश पारित केल्याची माहिती तहसीलदार मदन जाधव यांनी दिली.त्यामुळे मोकळ्या वातावरणात पारंपारिक वाद्यासह मिरवणूका काढाव्या लागणार आहे.
मंगळवेढा तालुक्यात 170 पेक्षा अधिक मंडळांनी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करावे लागणार आहे. त्या संदर्भातील माहिती तालुक्यातील गणेश मंडळांना व संबंधित गावच्या पोलीस पाटलांना देण्यासाठी पोलीस ठाण्यात बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पोलीस ठाण्यातून देण्यात आली.
त्यामुळे यंदाच्या मिरवणुकी दरम्यान लोप पावत चाललेली पारंपारिक वाद्ये आता मिरवणुकीसाठी आणावी लागणार आहेत. त्यामध्ये पारंपरिक खेळ, कसरती देखील सादर कराव्या लागणार आहे त्यामुळे पारंपारिक वाद्य वाजवणाऱ्या कलाकारांना आता चांगले दिवस येणार आहेत.
मिरवणुकीमध्ये गणेश उत्सव मंडळाकडून डॉल्बी सिस्टीम व लेझर लाईटचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी गणेश मुर्ती आगमन मिरवणुकीवेळी मिरवणुक बघण्याकरीता आलेल्या भाविकांना डॉल्बी सिस्टीममुळे काही व्यक्तींना कानाचा व छातीचा त्रास होऊन कायमचे अपंगत्व अथवा जिवितास धोका निर्माण झाल्याची प्रकरणे निदर्शनास आली.
तर लेझर लाईट डोळयावर पडल्यामुळे मुख्यत्वे वयोवृध्द व लहान मुलांच्या डोळयाचा पडद्याला तसेच बुबळाला इजा झालेल्या घटना घडलेल्या आहेत. यावाचन जेष्ठ नागरिक संघटनांनी त्यांना व इतर नागरिकांना डॉल्बी सिस्टीम व लेझर लाईटच्या जिवितास धोका तसंच इतर शारिरिक दुष्परीणाम होत असल्याचे निवेदन या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केल्याने जिल्हाधिकारीनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (1) अन्वये, दि.27 ऑगस्ट ते दि.6 सप्टेंबर पर्यंतच्या कालावधीत जिल्हयामध्ये सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाकडून आयोजित मिरवणुकीमध्ये डॉल्बी सिस्टीम व लेझर लाईटचा शो/वापर करणेस भारतीय नारिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (1) मध्ये नमूद केल्यानुसार प्रतिबंध केले.