धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीबद्दल हेमा मालिनी यांनी केलेलं भाष्य; गरोदर असताना चोरून भेटायला आलेल्या सासूबाई; म्हणाल्या-
esakal August 31, 2025 06:45 AM

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या दोन कुटुंबांमधील गुंतागुंतीचे संबंध नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहेत. १९८० मध्ये धर्मेंद्र यांनी पहिल्या पत्नी प्रकाश कौर आणि चार मुलांच्या उपस्थितीत अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याशी दुसरं लग्न केलं. या दोन्ही कुटुंबांनी आपापल्या परीने या परिस्थितीचा स्वीकार केला आहे, पण त्यांचे संबंध नेहमीच मर्यादित राहिले आहेत.

हेमा आणि प्रकाश कौर यांच्यातील दुरावा

हेमा मालिनी यांनी त्यांच्या 'हेमा मालिनी: बियॉन्ड द ड्रीम गर्ल' या आत्मचरित्रात प्रकाश कौर यांच्याबद्दल फारसं काही लिहिलं नाही. त्यांनी स्पष्ट केलं की, काही विषय सार्वजनिक चर्चेसाठी नसतात. लग्नाला जवळपास ४५ वर्षं झाली असली तरी, हेमा मालिनी कधीच धर्मेंद्र यांच्या मूळ घरी गेल्या नाहीत. विशेष म्हणजे, त्यांचे जुहू येथील बंगले काही मीटरच्या अंतरावर आहेत.

प्रकाश कौर आणि हेमा मालिनी यांची थेट भेट झाली नसली, तरी ईशा देओलने एकदा त्यांची भेट घेतली होती. ही घटना ३० वर्षांनंतर घडली होती, जेव्हा धर्मेंद्रचे भाऊ अजित आजारी होते. त्यावेळी ईशा देओल पहिल्यांदाच तिच्या वडिलांच्या मूळ घरी गेली होती. तिने सांगितले की, "मी त्यांच्या (प्रकाश कौर) पाया पडले, त्यांनी मला आशीर्वाद दिला आणि मी निघून आले."

सासूबाईंनी दिला होता आशीर्वाद

धर्मेंद्र यांच्या आई सतवंत कौर यांच्याबद्दल हेमा मालिनी यांनी एक हृदयस्पर्शी किस्सा सांगितला. जेव्हा त्या गरोदर होत्या, तेव्हा सतवंत कौर त्यांना भेटायला एका डबिंग स्टुडिओमध्ये आल्या होत्या. "त्यांनी घरात कोणालाही न सांगता मला भेट दिली. मी त्यांच्या पाया पडले. त्यांनी मला मिठी मारली आणि नेहमी खूश राहा असा आशीर्वाद दिला," असं हेमा यांनी सांगितलं.

हेमा मालिनी यांचे स्पष्ट मत

हेमा मालिनी यांनी या गुंतागुंतीच्या परिस्थितीबद्दल बोलताना आपलं मत मांडलं. 'मला कोणालाही त्रास द्यायचा नव्हता. धरमजींनी माझ्यासाठी आणि माझ्या मुलींसाठी जे काही केलं, त्यावर मी समाधानी आहे. त्यांनी नेहमीच एका सामान्य वडिलांप्रमाणे त्यांची जबाबदारी पार पाडली.' हेमा मालिनी यांनी स्पष्ट केले की त्या प्रकाश कौर यांचा खूप आदर करतात. "मी त्यांच्याबद्दल कधीच बोलले नसले, तरी मी त्यांचा आदर करते. माझ्या मुलीही धरमजींच्या कुटुंबाचा आदर करतात." त्या पुढे म्हणाल्या की, "लोकांना आमच्या आयुष्याबद्दल बरंच काही जाणून घ्यायचं आहे, पण आमचं आयुष्य लोकांसाठी नाहीये."

ईशा देओलची भावना

अभिनेत्री ईशा देओल ने सांगितले की, ती चौथीत असताना तिच्या आईने तिला तिच्या वडिलांच्या पहिल्या लग्नाबद्दल आणि त्यांच्या मुलांबद्दल सांगितले होते. "शाळेत कोणीतरी मला 'दोन आई असलेली मुलगी' म्हणून चिडवले होते. तेव्हा मला समजले की माझ्या आईने अशा व्यक्तीशी लग्न केले आहे, ज्यांचे आधीच एक कुटुंब आहे. पण मला त्या गोष्टीचं कधीच वाईट वाटलं नाही. मला त्यात काहीच चुकीचं वाटत नाही," असे ईशा म्हणाली.

आपल्यापेक्षा छोट्या अभिनेत्रीसमोर फिकी पडली तेजश्री प्रधान; टीआरपी यादीवर जुईचं राज्य; पण 'घरोघरी...'चं स्थान पाहून वाटेल आश्चर्य
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.