Nahur Bird Park : मुंबईत सिंगापूरसारखं बर्ड पार्क, कसा असेल हा संपूर्ण प्रोजेक्ट
Saam TV August 31, 2025 06:45 AM

मुंबई आणि पक्षीप्रेमींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. पुढील काही वर्षात मुंबईच्या नाहुरमध्ये भारतातलं पहिलं बर्ड पार्क उभं राहणार आहे. शुक्रवारी बृहन्मुंबई महानगरपालिकेने या महत्त्वाकांक्षी प्रक्लपासाठी १६६ कोटी रूपयांचे निविदा पत्र काढले आहे. विशेष म्हणजे या बर्ड पार्कमध्ये भारतीय पक्ष्यांसोबतच काही परदेशी पक्षी देखील पहायला मिळणार आहेत. हा बर्ड पार्क सिंगापूरमधील जुरोंग या प्रसिद्ध बर्ड पार्क प्रमाणेच भव्य आणि डोळे दिपवणाऱ्या निसर्गरम्य दृष्यांनी परिपूर्ण असेल.

Mumbai Airport : मुंबई विमानतळाचे टर्मिनल १ पाडलं जाणार, पण कधी? कारण काय?

सध्या मुंबईच्या भायखळामध्ये असलेल्या राणीच्या बागेत एक पक्षीगृह आहे. नागरी अधिकऱ्यांनी सांगितले की, नाहुरमधील बर्ड पार्कचे काम पूर्ण होऊन पुरेशा सोई-सुविधा उपलब्ध झाल्यानंतर, राणीच्या बागेतील काही पक्षी दुसऱ्या केंद्रात स्थलांतरीत केले जातील. तसेच काही नवीन पक्षीही आणले जातील. या बर्ड पार्कमध्ये तेथील रहिवाशांच्या मनोरंजनासाठी निसर्गरम्य उद्यानासह एक स्विमिंग पूल, बास्केटबॉल कोर्ट आणि टेनिस कोर्टही असणार आहे.

हा बर्ड पार्क १७,१५० वर्ग मीटर किंवा ६.५ एकरच्या क्षेत्रात उभारण्यात येणार आहे. यासाठी महानगरपालिकेने एकूण २४ महिन्यांचा काळ निश्चित केला आहे. २०२८ पर्यंत हे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. नाहुरमध्ये सुरू होणाऱ्या या बर्ड पार्कमध्ये वेगवेगळे झोन बनवले जाणार आहेत जिथे विविध प्रदेशातील पक्षी ठेवण्यात येतील. हे बर्ड पार्क अनेक विभागांमध्ये विभागले जाईल. ज्यामध्ये अफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या देशांच्या झोनचा समावेश असेल. या झोनमध्ये विशेषतः या प्रदेशातील पक्षी ठेवण्यात येतील.

Penguin Tender|पेंग्विन टेंडर मागे घेतलं जाणार नाही; महापौर किशोरी पेडणेकरांची स्पष्टोक्ती!

या बर्ड पार्कमध्ये सन कोन्युर, गोल्डन कोन्युर, एक्लेक्टस पॅरट, अफ्रिकन ग्रे पॅरट, शहामृग, टोको टूकून, ब्लॅक स्वान इत्यादी पक्षी ठेवण्यात येणार आहेत अशी माहिती आहे. येथे पक्ष्यांच्या सुविधेसोबतच या ठिकाणी भेट देण्यास येणाऱ्या पर्यटकांसाठी देखील आवश्यक सोई-सुविधा असणार आहेत. जसे की, रोटरच्या सहाय्याने स्वयंमचलितपणे काम करणारी भूमिगत पार्किंग व्यवस्था ज्यामध्ये एकावेळी जास्तीत जास्त ६० कार पार्क होऊ शकतील.

पार्कच्या योजनेबद्दल बोलताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, पार्कमधील पाण्याची गुणवत्ता, तापमान नियमन आणि पोषक तत्त्वांचा समतोल सुनिश्चित करणारी एक सपोर्ट सिस्टम तयार केली जाईल. जी पक्ष्यांसाठी निरोगी आणि स्थिर वातावरण राखण्याचे काम करेल. याशिवाय नागरिकांसाठी बसण्याची जागा आणि एक अँफीथिएटर, फुटपाथ आणि एक रेस्टोरेंट देखील असणार आहे. सोबतच पार्कचे सौंदर्य अधिक आकर्षक बनवण्यासाठी दगडी बांधकामही असेल.

मुंबईचे वातावरण तापलं, BMC समोर मोठा गोंधळ, मराठा आंदोलक अन् पोलिसांमध्ये बाचाबाची, व्हिडिओ
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.