भाडेकरूंची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक
जिल्हाधिकारी किशन जावळे यांचा आदेश; परप्रांतीयांच्या संख्येत वाढ
अलिबाग, ता. ३० (वार्ताहर) ः रायगड जिल्ह्यात सुरक्षा व्यवस्थेची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी आपली घरे, दुकाने, फ्लॅट किंवा फार्महाउस भाड्याने देताना अथवा विक्री करताना भाडेकरू आणि खरेदीदारांची संपूर्ण माहिती संबंधित पोलिस ठाण्यात देणे बंधनकारक राहील, असे सांगण्यात आले आहे.
पोलिस अधीक्षकांच्या अहवालानुसार, रायगड जिल्ह्यातील औद्योगिक भाग, शहरी वसाहती तसेच फार्महाउस परिसरात मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय नागरिक नोकरी, व्यवसाय किंवा इतर कारणांसाठी वास्तव्यास येतात; मात्र मालकांकडून या भाडेकरूंची माहिती पोलिस ठाण्यात वेळेवर दिली जात नाही. त्यामुळे संशयास्पद हालचाली किंवा गुन्हेगारी कृत्यांवर वेळीच नियंत्रण आणणे कठीण होते. काही वेळा दहशतवादी किंवा नक्षलवादी घटकांनी भाडेकरू म्हणून वास्तव्य करून गुन्हेगारी कारवाया केल्याचेही उदाहरणे आहेत. त्यामुळे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने ही सक्ती केली आहे. नवीन आदेशानुसार, मालमत्ताधारकांनी भाडेकरू अथवा खरेदीदार यांची नावे, पत्ता, संपर्क क्रमांक, ओळखपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रांची माहिती भाडेकरार किंवा विक्री झाल्यानंतर सात दिवसांच्या आत संबंधित पोलिस ठाण्यात नोंदवावी. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई होणार आहे.
..................
गुन्हेगारी कारवाया रोखण्यास मदत
हा आदेश तातडीने लागू होत असून पुढील दोन महिने प्रभावी राहणार आहे. नागरिकांच्या सहकार्याशिवाय कायदा व सुव्यवस्था राखणे अवघड असल्याचे प्रशासनाचे मत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी जावळे यांनी सर्व नागरिकांना सुरक्षिततेसाठी आवश्यक माहिती वेळेत पोलिस ठाण्यात सादर करण्याचे आवाहन केले आहे. या निर्णयामुळे परप्रांतीयांची अचूक माहिती प्रशासनाकडे उपलब्ध होणार असून, संभाव्य गुन्हेगारी कारवाया रोखण्यास मोठी मदत होणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हा आदेश महत्त्वपूर्ण ठरणार आहे.