तुर्भे एमआयडीसी मार्गावर वाहतूक कोंडी
१५ दिवसांत नियोजन न केल्यास जनआंदोलनाचा शिवसेनेचा इशारा
तुर्भे, ता. ३० (बातमीदार) ः तुर्भे एमआयडीसी येथील तुर्भे नाका ते महापे मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या समस्येमुळे स्थानिक रहिवासी आणि कामगारवर्ग अत्यंत त्रस्त झाला आहे. वाहतुकीची अव्यवस्था व रस्त्यावर अडथळा निर्माण झाल्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन प्रभावित होत आहे. याबाबत येत्या १५ दिवसांत वाहतुकीचे नियोजन केले नाही, तर जनआंदोलन केले जाईल, असा इशारा उद्धव ठाकरे गटाकडून पोलिस प्रशासनाला देण्यात आला आहे.
ठाणे-बेलापूर रोडवरील तुर्भे स्थानकासमोरील पुलाचे काम नवी मुंबई महापालिकेने सुरू केले होते. मात्र तांत्रिक अडचणी आणि काही स्थानिक राजकीय स्वार्थामुळे हे काम रखडले आहे. पुलासाठी केलेल्या खोदकामामुळे वाहतूक मार्ग बदलण्यात आला आणि त्यामुळे तुर्भे एमआयडीसी, इंदिरानगर, गणपतीपाडा, बोनसरी गाव, चुनाभट्टी, आंबेडकरनगर, गणेशनगर या परिसरातून वाहतूक सुरू आहे. यामुळे नागरिकांना रोजच्या प्रवासात मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या वाहतूक कोंडीमुळे शालेय विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत पोहोचता येत नाही. कर्मचाऱ्यांना कामावर जाण्यास विलंब होतो, तर वृद्ध आणि महिलांसाठी प्रवास धोकादायक ठरत आहे. अनेक अपघातही घडले असून, नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिका आणि पोलिस प्रशासनाने येत्या १५ दिवसांत वाहतुकीचे योग्य नियोजन केले नाही, तर प्रचंड जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उप जिल्हाप्रमुख, नवी मुंबई तसेच शहरप्रमुख ऐरोली विधानसभा महेश कोटीवाले आणि उपशहर प्रमुख सिद्धाराम शीलवंत यांच्या नेतृत्वाखाली तुर्भे एमआयडीसी वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे.