Ganpati Dance : डीजेवर नाचून झालं आता कोर्टाच्या पायऱ्या झिजवायच्या, महाविद्यालयीन तरूणांवर गुन्हे; करिअर बरबादीच्या भितीने अनेकांचे धाबे दणाणले
esakal August 31, 2025 06:45 AM

Court Case On College Youth : गणेश आगमन मिरवणुकीवेळी अनेक मंडळांकडून साऊंड सिस्टीमचा वापर करण्यात आला. पंधरा-वीस कार्यकर्ते असलेल्या मंडळांकडूनही पैशांची उधळण होताना दिसली. साऊंड सिस्टीम मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या ३५४ मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी, साऊंड सिस्टीम मालकाविरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे. याची माहिती मिळताच शिक्षण घेणाऱ्या अनेक तरुणांचे धाबे दणाणले आहेत. खटले न्यायालयात पाठविण्यात येणार असून, भविष्यात त्यांच्या करिअरला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिकेच्या निवडणुकांचे वारे वाहू लागल्याने अनेक मंडळे यावर स्वार झाल्याचे चित्र आहे. वीस-पंचवीस कार्यकर्ते घेऊन अनेक जण मिरवणुकांनी गणेशमूर्ती घेऊन जाताना दिसले. एक लाखापासून तीन लाखांपर्यंत साऊंड सिस्टीमचे भाडे देण्यासाठी पैसे आले कोठून, हा प्रश्न अनेकांना पडला. मिरवणुकीच्या दिवशी शहरासह उपनगरात साऊंड सिस्टीमचा दणदणाट पाहायला मिळाला. पोलिसांकडून या आवाजाचे नमुने नोंदवण्यात आले आहेत. ९० डेसिबल ते १२० डेसिबलपर्यंत आवाज गेल्याने अशा मंडळांची नोंद करून घेण्यात आली.

अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांविरोधात खटले....

ज्या मंडळांनी आवाजाची मर्यादा ओलांडली त्यांची संख्या चारशेच्या घरात गेली आहे. अशा सर्व मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी, साऊंड सिस्टीम मालकांची नावे पोलिसांनी घेतली आहेत. या मंडळांविरोधात खटला बनवून तो आता न्यायालयाकडे पाठविण्याची तयारी सुरू आहे. विसर्जन मिरवणुकीत साऊंड सिस्टीमची संख्या वाढण्याची शक्यता गृहीत धरून आतापासूनच पोलिसांनी मंडळांची माहिती जमविण्यास सुरुवात केली आहे.

Road Accident Kolhapur : कामातून दोन परप्रांतिय मित्रांची घट्ट मैत्री पण नियतीच्या मनात काही वेगळचं, अपघातात दोघांचा मृत्यू

कुटुंबीयांचीही धावपळ...

मंडळाचे पदाधिकारी म्हणून ज्यांनी नावे दिली आहेत त्यांपैकी अनेक जणांचे धाबे दणाणले आहेत. शिक्षण घेणाऱ्यांच्या करिअरमध्ये या खटल्यांचा अडथळा येऊ शकतो. शासकीय तसेच अनेक नामांकित कंपन्यांकडून नोकरी देताना ‘चारित्र्य पडताळणी’ दाखल्याची मागणी केली जाते. गुन्हे दाखल झालेल्या तरुणांना हे दाखले मिळताना अडचणी येतात. परदेशी शिक्षण, नोकरीला जाताना पासपोर्ट व्हेरिफिकेशन वेळीही पोलिसांकडून या गुन्ह्यांचा उल्लेख झाल्याने स्वप्ने धुळीस मिळाल्याची अनेक उदाहरणे आहेत. अशा कार्यकर्त्यांच्या पालकांचीही धावपळ उडाली.

नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या साऊंड सिस्टीम मालकांना अद्दल घडविली जाईल. प्रसंगी त्यांचे साहित्य जप्त करण्याच्या सूचना पोलिस ठाण्याला दिल्या आहेत. तरुणांनी करिअरचा विचार करून असे गुन्हे दाखल होऊ नयेत याची काळजी घ्यावी.

- योगेशकुमार गुप्ता, पोलिस अधीक्षक.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.