वाल्हे, ता. ३० : वाल्हे (ता. पुरंदर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राष्ट्रीय क्रिडा दिन अन् हॉकीपट्टू मेजर ध्यानचंद यांची जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
शनिवारी (ता. ३०) क्रिडा दिनानिमित्त आयोजित सायकल रॅलीने या उत्सवाचा प्रारंभ सरपंच अतुल गायकवाड यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून केला. यावेळी मधुरा भुजबळ, अमृता भुजबळ, जयश्री खोचे, रूपाली भोसले, भाग्यश्री भुजबळ, गौरी पवार, सोनाली पवार, मनिषा ढवळे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी हातात विविध घोषणांचे फलक घेऊन आरोग्य, क्रीडा आणि स्वच्छतेविषयी संदेश गावात पोहोचवले. आरोग्य हीच खरी संपत्ती, खेळामुळे शरीर तंदुरुस्त राहते, अशा प्रकारच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. क्रिडा दिनाच्या निमित्ताने शाळेमध्ये तीन दिवस विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये महिला पालकांसाठी संगीत खुर्ची, चमचा लिंबू, लंगडी, रस्सीखेच आदी विविध खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये क्रिडा संस्कृती जोपासण्यावर भर देण्यात आला. प्रभातफेरीदरम्यान चिमुकल्यांनी दिलेल्या घोषणांमधून आरोग्य विषयक जनजागृती केली.
क्रिडादिनाच्या यशस्वितेसाठी प्रभारी मुख्याध्यापक लालासो खुडे, सहशिक्षिका अस्मिता भागवत, जयश्री पवार, मीनल खोडके, कीर्ती लिपारे, नयना पवार आदींनी परिश्रम घेतले. शाळा व्यवस्थापन समिती सदस्या सोनाली पवार यांच्याकडून खाऊ वाटप केले.