तळेगाव ढमढेरे, ता. ३० : तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीचा तुटवडा जाणवत असल्याने अचानक कुत्रा चावलेल्या रुग्णांची गैरसोय होत आहे.
तळेगाव ढमढेरे येथे मोलमजुरी करून वास्तव्यास असणाऱ्या रमेश शिवाजी दुगाव (मूळगाव लातूर) या ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला शनिवारी (ता.३०) कुत्र्याने चावा घेतला. त्यानंतर रमेश हे तळेगाव ढमढेरे येथे आले असता येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लस उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर माजी उपसरपंच व सोसायटीचे संचालक विजय ढमढेरे यांनी रमेश दुगाव यांना पुन्हा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता तेथील वैद्यकीय अधिकारी संध्या कारंडे यांनी सांगितले की, आरोग्य केंद्रातील लस संपलेली आहे. त्यांना दुसरीकडे लसीसाठी जायला सांगितले आहे. दरम्यान, तळेगाव ढमढेरे सारख्या मोठ्या लोकसंख्येच्या गावात कुत्रा चावल्यानंतर प्रतिबंध करण्यासाठी लस उपलब्ध नसल्याने ढमढेरे यांनी खंत व्यक्त केली. तसेच त्यांनी सकाळचे बातमीदार, आमदार माऊली कटके व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना दूरध्वनीवरून लस नसल्याची माहिती दिली.
"तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण १७ गावे येतात. या गावातील नागरिकांना कुत्र्याने चावा घेतल्यास लस उपलब्ध करून दिली जाते; परंतु आता लस उपलब्ध नाही. संबंधित व्यक्तीला दुसऱ्या आरोग्य केंद्रात जाण्यास सांगितले आहे. आरोग्य विभागाकडे एकूण ५०० लस मागविण्यात आली आहेत. लस लवकरच उपलब्ध होईल. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र सतत क्रियाशील आहे."
- संध्या कारंडे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, तळेगाव ढमढेरे