नाशिक: भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांच्यासह इतर आरोपींना अटक करा, तपास अधिकारी तत्काळ बदला, सर्व संशयित आरोपींना मकोका लावा, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही व इथून आम्ही उठणारही नाही, असा आक्रमक पवित्रा नांदूर नाका येथील धोत्रे कुटुंबीयांनी घेतला. रात्री उशिरापर्यंत २०० हून अधिक नागरिक, धोत्रे कुटुंब व वडार समाज संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन कक्षाजवळ ठाण मांडून होते.
राहुल धोत्रे यास मारहाणीच्या व्हायरल व्हिडिओमध्ये जे मारहाण करत आहेत, त्यांना आत्तापर्यंत अटक केलेली नाही. पोलिस प्रशासनाची भूमिका संशयास्पद आहे, असा थेट आरोप धोत्रे कुटुंबीयांनी केला. मोठ्या संख्येने जिल्हा रुग्णालयात जमाव उपस्थित असल्यामुळे तणावाचे वातावरण संपूर्ण परिसरात पसरले होते. पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त नितीन जाधव, सरकारवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश आव्हाड यांच्यासह मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
शवविच्छेदन इन कॅमेरा व्हावे अशी मागणी धोत्रे कुटुंबीय व नागरिकांनी केली. त्यानुसार शवविच्छेदन करण्यात आले. मात्र रात्री साडेनऊपर्यंत संशयित माजी नगरसेवक उद्धव निमसे यांना अटक करा, या मागणीवर कुटुंबीय ठाम राहत रुग्णालयात ठाण मांडून आहेत.
पोलिस आयुक्तांशी चर्चा
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रियदर्शन तेलंग, वडार समाजाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव, ॲड. सरोजित बनसोडे, जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा ऊर्मिला गायकवाड, युवक जिल्हाध्यक्ष दामोदर पगारे, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष मिहीर गजबे, प्रवक्ते बाळासाहेब शिंदे आदींसह नागरिकांनी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेऊन संशयितांवर मोका, ॲट्रॉसिटीचे कलम लावण्याची व फरारी संशयितांना तातडीने अटक करण्याची मागणी केली. दरम्यान, यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून निमसे यांच्या निवासस्थानीही बंदोबस्त तैनात केला आहे.
राहुल धोत्रे याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाल्यावर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून नांदूर नाका एक किलोमीटरच्या परिसरामधील सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत. फरारी संशयितांना पकडण्यासाठी चार पथके रवाना केली आहेत. सीसीटीव्ही तपास सुरू असून, अन्य संशयित निष्पन्न झाल्यास त्यांनाही अटक केली जाईल.
- मोनिका राऊत, पोलिस उपायुक्त, परिमंडळ एक, नाशिक शहर
Nashik News : नांदूर नाका हाणामारीतील जखमी राहुल धोत्रेचा मृत्यू; माजी नगरसेवक उद्धव निमसे यांच्यासह इतरांवर खुनाचा गुन्हा दाखलजोपर्यंत माझ्या भावाच्या मुख्य आरोपी, मारेकऱ्यांना अटक होत नाही, तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही. पोलिस प्रशासनाने तत्काळ उद्धव निमसेंसह इतर संशयितांना अटक करावी.
- आकाश धोत्रे
तपासामध्ये सुरुवातीपासूनच हलगर्जी झाली आहे. मारेकऱ्यांना अंतरिम जामीन यामुळेच मिळाला. पोलिसांनी तत्परता दाखवून या प्रकरणाचा प्रमुख आका व त्याच्या साथीदारांना तत्काळ अटक करावी.
- ॲड. सुरेश आव्हाड