वसई, ता. ३१ (बातमीदार) : नारळी पौर्णिमेनंतर गणेशोत्सवाला कोळी बांधव अनन्यसाधारण महत्त्व देतात. आपल्यावर निसर्गाची कृपादृष्टी राहावी, मासेमारी भरपूर होऊ दे, समुद्र शांत राहो यासाठी प्रार्थना केली जाते. मासेमारी करण्यासाठी गेलेला कोळीबांधव गौरीची मनोभावे पूजा करण्यासाठी माघारी फिरला असून, बोटी किनाऱ्याला विसावल्या आहेत.
ऑगस्टमध्ये पावसाळ्यात बंद झालेली मासेमारी सुरू झाली, मात्र अनेक नैसर्गिक आपत्तींना मच्छीमार बांधवांना तोंड द्यावे लागले. हवामान खात्याने दिलेल्या वादळी व जोरदार पावसाच्या इशाऱ्यामुळे अनेक बोटींना मासेमारीसाठी जाता आले नाही, परंतु पुन्हा खोल समुद्रात मासेमारी सुरू झाली. पापलेट, सुरमई व अन्य मासे मोठ्या प्रमाणात मिळू लागले आहेत. त्यामुळे कोळी महिलांनादेखील मासेमारी विक्रीतून रोजगाराचे साधन प्राप्त झाले आहे. अनेकदा संकटांचा सामना करावा लागतो.त्या वेळी देवाचा धावा केला जातो. आता हंगामी कालावधी सुरू असताना मासेमारी थांबवून मच्छीमार कोळीवाड्यात परतला आहे.
पारंपरिक चालत आलेल्या रुढींचे जतन गौरी सणाला केले जाते. सध्या मासेमारीचा कालावधी असला तरी कोळी बांधव गौरीपूजेसाठी व्यग्र आहे. त्यानंतर पुन्हा मासेमारी करण्यासाठी जाणार आहे. निसर्गाची कृपा कोळी बांधवांवर कायम राहावी, यासाठी गौरी देवीला प्रार्थना केली जाणार आहे.
- विक्रम वसईकर, अर्नाळा