सोयाबीनच्या शेंगांना पिवळा मोझेंकचा धोका
esakal September 01, 2025 04:45 PM

काटेवाडी, ता. ३१ : सोयाबीन पिकात फुलोरा आणि शेंगा लागण्याच्या टप्प्यावर पांढऱ्या माशीमुळे पिवळा मोझेंक रोगाचा धोका वाढला आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठातील क्रॉपसॅप प्रकल्पातील तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना किडीचे नियंत्रण करून रोगाचा प्रसार रोखण्याचे आवाहन केले आहे. पावसातील खंड आणि ३० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानामुळे पांढरी माशी झपाट्याने वाढते. ज्यामुळे उत्पादनात ५० टक्क्यांपर्यंत घट येण्याची भीती आहे.

रोग प्रसाराची मुख्य कारण: पांढरी माशी ही रसशोषक कीड मुंगबीन यलो मोझेंक वायरस पसरवते. त्यामुळे झाडाच्या पानांतून विषाणूचा प्रसार करते. तज्ज्ञांच्या मते, पांढऱ्या माशीचे नियंत्रण वेळीच केल्यामुळे रोगाचा प्रसार ८० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. नियंत्रण न झाल्यास संपूर्ण शेत नष्ट होण्याची शक्यता आहे. नियमित निरीक्षण आणि योग्य उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांनी तत्काळ पांढऱ्या माशीवर नियंत्रण ठेवावे, जेणेकरून सोयाबीनचे उत्पादन वाचेल आणि शेतकऱ्यांचे नुकसान टळेल. पांढऱ्या माशीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी पाऊस थांबल्यानंतर त्वरित उपाययोजना कराव्यात, ज्यामुळे रोगाचा प्रसार कमी होतो. क्रॉपसॅप प्रकल्पातील तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
डॉ. सखाराम आघाव, डॉ. सचिन महाजन आणि डॉ. देवानंद बनकर यांच्या नेतृत्वाखालील क्रॉपसॅप प्रकल्पाने शेतकऱ्यांना नियमित पिकाचे निरीक्षण आणि योग्य उपाययोजनांचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे.

ही आहेत रोगाची लक्षणे
पानांवर पिवळे ठिपके, नंतर संपूर्ण पान पिवळे पडते
झाडाची वाढ खुंटते, पाने लहान होतात, फुले-शेंगा कमी लागतात, दाणे लहान राहतात
लहान अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास झाड पूर्णपणे पिवळे होऊन उत्पादनात मोठी घट


प्रतिबंधात्मक उपाय....
रोगप्रतिकारक जाती आणि निरोगी बियाणांचा वापर.
उन्हाळी किंवा मे महिन्यातील लागवड टाळा.
मका किंवा तूर यांसारखी आंतरपिके घ्या.
शेत तणमुक्त ठेवा, प्रतिएकर १०-१२ पिवळे चिकट सापळे लावा.
नत्र खताचा अतिरिक्त वापर टाळा.
रोगग्रस्त झाडे समूळ काढून जाळा किंवा जमिनीत पुरा.


नियंत्रणाचे उपाय....
जैविक उपाय: पेरणीनंतर ३०-३५ दिवसांनी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडिरॅक्टिन १००० पीपीएम (५० मिली/१० लिटर पाणी) फवारणी.
रासायनिक उपाय: असिटामिप्रीड २५ टक्के + बायफॅथ्रीन २५% डब्लूजी (५ ग्रॅम), फ्लोनिकामीड ५० टक्के डब्ल्यूजी (४ ग्रॅम) किंवा पायरीप्रोक्झीफेन १० टक्के + बायफॅथ्रीन १० टक्के ईसी (२० मिल Oscillator;20 मिली/१० लिटर पाणी) यापैकी एकाची फवारणी.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.