म्हाडाच्या संभाजीनगर मंडळाच्या घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
मुंबई, ता. ३१ : म्हाडाचा विभागीय घटक असलेल्या छत्रपती संभाजीनगर मंडळाच्या अखत्यारीतील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत एक हजार ३२३ निवासी सदनिका व १८ भूखंडांच्या लाॅटरीसाठी अर्ज करण्यास ८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार अद्याप अर्ज न केलेल्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सदनिका विक्री सोडतीत नवीन वेळापत्रकानुसार सहभाग घेण्याकरिता ८ सप्टेंबरला रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्जदारांना ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे. सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदार या लाॅटरीसाठी पात्र ठरणार आहेत. त्यानुसार सोडतीसाठी पात्र अर्जांची प्रारूप यादी १५ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. २४ सप्टेंबरला दुपारी १२ वाजता अंतिम पात्र अर्जाची यादी जाहीर केली जाणार आहेत. १ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे संगणकीय सोडतीचा कार्यक्रम होणार आहे.