Viral Video: वाईड बॉलवर आधी स्वीच हिट अन् मग हिट विकेट; T20 मॅचमध्ये फलंदाज विचित्रपद्धतीने बाद
esakal September 01, 2025 06:45 PM
  • कॅरेबियन प्रीमियर लीग २०२५ मध्ये वेस्ट इंडिजचा शाय होप विचित्रपद्धतीने हिट विकेट झाला.

  • होपने स्वीच हिटचा प्रयत्न करताना स्वत:च्या बॅटने स्टंप्स उडवले.

  • त्रिनबॅगो नाईट रायडर्सने हा सामना ६ विकेट्सने जिंकला.

क्रिकेटमध्ये फलंदाजाला ११ वेगवेगळ्या प्रकारे बाद करता येतं. यातील एक प्रकार म्हणजे हिट विकेट, ज्यात फलंदाज स्वत:च्या चुकीने बाद होतो. पण नुकतेच कॅरेबियन प्रीमियर लीग २०२५ मध्ये वेस्ट इंडिजचा शाय होप हिट विकेटही विचित्रपद्धतीने झाला. शनिवारी त्रिनबॅगो नाईट रायडर्स विरुद्ध गयाना ऍमेझॉन वॉरियर्स संघात सामना झाला होता, ज्यात ही घटना घडली. हा सामना त्रिनबॅगोने ६ विकेट्सने जिंकला.

On This Day: अफगाणिस्तानचा 'करामती' खान! राशिदने फक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटच नाही, तर IPL, BBL अन् CPL मध्येही घेतली हॅट्रिक

झाले असे की गयाना प्रथम फलंदाजीसाठी उतरला होता. यावेळी होप तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत होता. यावेळी टेरेन्स हिंड्सने टाकलेल्या १४ व्या षटकाचा शेवटचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड जात असताना होप विचित्र स्थितीत गेला आणि त्याने थर्ड मॅनच्या दिशेने स्वीच हिट मारण्याचा प्रयत्न केला.

पण त्याचा अंदाज चुकला आणि त्याचीच बॅट स्टंपवर आदळली. त्यामुळे होपला २९ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकारासह ३९ धावांवर बाद होऊन माघारी परतावे लागले. त्याची विकेट पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. त्याच्या विकेटचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

दरम्यान, या सामन्यात गयानाकडून शाय होपनेच सर्वाधिक धावा केल्या. त्याच्यापाठोपाठ क्वेन्टिन सॅम्पसनने २५ आणि प्रीटोरियसने २१ धावा केल्या. बाकी कोणाला २० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. त्यामुळे गयानाला २० षटकात ९ बाद १६३ धावाच करता आल्या.

त्रिनबॅगोकडून अकिल हुसैनने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. टेरेन्स हिंड्सने २ विकेट्स घेतल्या. अमीर, आंद्रे रसेल आणि सुनील नरेन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

CPL 2025 : शाहरुखच्या संघातील फलंदाजाचे २० चेंडूंत ९२ धावांसह वादळी शतक; मोडला निकोलस पूरनचा रेकॉर्ड

त्यानंतर १६४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्रिनबॅगोने १७.२ षटकात ४ विकेट्स गमावत १६९ धावा केल्या आणि सामना जिंकला. त्रिनबॅगोकडून ऍलेक्स हेल्सने ७४ धावा केल्या, तर कॉलिन मुनरोने ५२ धावा केल्या आहेत. गयानाकडून चारही विकेट कर्णधार इम्रान ताहिरने ४ विकेट्स घेतल्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.