शारदीय नवरात्रोत्सवाच्या कामाचे भूमिपूजन
कल्याण, ता. २ (वार्ताहर) : डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ, डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवली पूर्वेतील डीएनसी शाळेच्या मैदानावर रासरंग शारदीय नवरात्रोत्सव आयोजित केला जातो. यावर्षीचा शारदीय नवरात्रोत्सव २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. मंगळवारी (ता. २) उत्सवाच्या स्टेज व मंडपाच्या कामाचा भूमिपूजन समारंभ पार पडला.
या भूमिपूजन समारंभाचे पूजन शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, महिला जिल्हा संघटक लता पाटील, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, युवासेना जिल्हाप्रमुख जितेन पाटील, श्री नवदुर्गा युवा मंडळाचे सोमिल खिमसरीया व सेक्रेटरी हिमांशू शहा यांच्या हस्ते, श्री गणेशाला श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावर्षीच्या नवरात्रोत्सवामध्येदेखील देशातील सुप्रसिद्ध नैतिक नागडा यांच्या ऑर्केस्ट्राच्या तालावर दांडिया आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी दांडियाप्रेमी व दुर्गाभक्त नागरिक बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी केले आहे.