पिंपरी, ता. ३ ः निगडीतील नृत्य कला मंदिराच्या वतीने गुरुवारी (ता. ४) मेघमल्हार संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. निगडी प्राधिकरण येथील ज्ञानप्रबोधिनी विद्यालय आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला अभिनेत्री निवेदिता सराफ, पंडित अंजली पोहनकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अनेक दिग्गज कलाकारांच्या अविस्मरणीय सादरीकरणांचा साक्षीदार ठरलेल्या मेघ मल्हार संगीत महोत्सवाचे यंदा चौदावे वर्ष. यावर्षीचा हा महोत्सव स्त्रीशक्तीला समर्पित करण्यात आला असून, गायन, वादन आणि नृत्य या तिन्ही क्षेत्रातील नामवंत स्त्री कलाकार आपली कला सादर करतील, अशी माहिती नृत्यकला मंदिराच्या संचालिका तेजश्री अडिगे यांनी दिली. नृत्यकला मंदिराच्या विद्यार्थ्यांनी अभिजात संगीत व नृत्याची ओळख करून घ्यावी, त्याचा प्रसार व्हावा आणि रसिकांना दर्जेदार कलापर्वणी अनुभवता यावी, हाच या महोत्सवाचा खरा हेतू आहे, असेही त्यांनी सांगितले.