swt212.jpg
88932
कणकवली ः येथील बसस्थानक.
swt213.jpg
88933
सावंतवाडी येथील बसस्थानकाचे संग्रहीत छायाचित्र.
बसस्थानकांची पुनर्बांधणी खासगी गुंतवणुकीवर
९८ वर्षांच्या करारावर विकासकांना जागा; कणकवली, तळेरे, सावंतवाडी यांचा समावेश
राजेश सरकारेः सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २ः सिंधुदुर्गातील मालवण, कुडाळ, वैभववाडी आदी स्थानके नव्याने उभी राहिली तर देवगड आणि वेंगुर्ले स्थानकांचे नूतनीकरण झाले. पण, उर्वरीत स्थानकांच्या पुर्नउभारणीसाठी राज्य शासनाकडे निधी नाही. त्यामुळे ‘बांधा, वापरा, हस्तांतर करा’ या धर्तीवर कणकवली, सावंतवाडी आणि तळेरे स्थानकांच्या पुर्नउभारणीची योजना शासनाने आखली आहे. यात स्थानके आणि आगार उभारणीनंतर उर्वरीत जागा खासगी विकासकांना विकासासाठी तब्बल ९८ वर्षाच्या करारावर दिली जाणार आहेत.
सिंधुदुर्गातील बहुतांश बसस्थानकांची उभारणी पन्नास वर्षापूर्वी झाली. यातील कणकवली, सावंतवाडी, तळेरे या स्थानकांच्या इमारती सध्या मोडकळीस आल्या आहेत. मात्र, दहा हजार कोटी रूपयांच्या तोट्यात असलेल्या एस. टी. महामंडळाकडे या इमारतींच्या उभारणीसाठी निधीच नाही. त्यामुळे थोडाफार तोटा भरून निघावा आणि बसस्थानकांचीही उभारणी व्हावी यासाठी राज्य शासनाने खासगी विकासकांच्या माध्यमातून बसस्थानकांची उभारणी करण्याची योजना आखली आहे. यात बसस्थानक आणि आगार उभारणीनंतर उर्वरित जागा त्या विकासकांना व्यापारी तत्वावर भाडे पट्ट्याने दिली जाणार आहे. याबाबतची माहिती एस. टी. चे विभागीय अभियंता अक्षय केंकरे यांनी दिली.
‘बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा’ ही योजना राज्य शासनाने एस. टी. महामंडळासाठी २००१ मध्ये लागू केली होती. त्या धोरणात भाडे कराराचा कालावधी ३० वर्षे होता. त्यानुसार सन २०१६ पर्यंत राज्यात ४५ ठिकाणी बसस्थानकांचा विकास करण्यात आला. मात्र, सिंधुदुर्गातील स्थानके विकसित करण्यासाठी खासगी संस्था तथा विकासकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. २०२४ मध्ये बसस्थानके विकसित करण्यासाठी राज्य शासनाने नवीन धोरण निश्चित केले. यात भाडेपट्टा कालावधी ३० वर्षावरून ६० वर्षे करण्यात आला. पण, राज्यातून पनवेल आणि छत्रपती संभाजीनगर स्थानक वगळता त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे महामंडळाच्या जमिनींचा व्यापारी तत्वावर व्यवहार्य ठरावा यासाठी आता हा कालावधीत ६० वर्षे ऐवजी ९८ वर्षे करण्यात आला आहे. कणकवली आणि तळेरे ही राष्ट्रीय महामार्गालगत वसलेली स्थानके आहेत तर सावंतवाडी स्थानकालाही मोठे महत्त्व आहे. त्यामुळे ही स्थानके विकसित करण्यासाठी खासगी विकासक पुढे येतील, अशी एस. टी. महामंडळाला अपेक्षा आहे. नव्या धोरणानुसार बसस्थानक आणि आगार या इमारती विकासकांकडून बांधून घेतल्या जाणार आहेत, त्याबदल्यात उर्वरित जागा त्या विकासकांना व्यापारी संकुल, गृहनिर्माण संस्था, मल्टीप्लेक्स आदी वेगवेगळ्या कारणांसाठी विकसित करण्यासाठी दिल्या जाणार आहे. तसेच यातून मिळणाऱ्या महसूलाची काही टक्केवारी एस. टी. महामंडळ घेणार आहे.
सद्यःस्थितीत कणकवली बसस्थानक आणि आगार मिळून ३० हजार ८०० चौरस मीटर एवढी जागा महामंडळाकडे आहे. सावंतवाडी बसस्थानक आणि आगार मिळून १४ हजार ५९०१ तर तळेरे बसस्थानकाकडे ६ हजार ३०० चौरस मीटर जागा आहे. या तिन्ही बसस्थानकांच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. त्यांच्या पुर्नउभारणीसाठी कोट्यवधींचा खर्च येणार आहे. हा खर्च उलचण्याची तयारी एस. टी. महामंडळाची नसल्याने ही तिन्ही बसस्थानके ''बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा'' या तत्वावर विकसित करण्याला शासनाने प्राधान्य दिले आहे. यापैकी कणकवली बसस्थानकाकडे तुलनेत अधिक जागा उपलब्ध आहे. शासनाच्या धोरणानुसार बसस्थानकाची इमारत, प्रशासकीय कार्यालय, प्रवाशी बैठक व्यवस्था, स्वच्छता गृह, कॅन्टीन, वर्कशॉप, १६ प्लॅटफॉर्म आणि अन्य आवश्यक गरजा भागवून उर्वरीत जागा व्यापारी तत्वावर भाडे तत्वावर दिली जाणार आहे. यामध्ये संबंधित उद्योजकाला जागा उपलब्ध नसेल तर वाढीव एफएसआय त्याला दिला जाणार आहे.
चौकट
कणकवली, सावंतवाडीची इमारत ५० वर्षाहून जुनी
कणकवली बसस्थानक इमारतीला ५० वर्षाहून अधिक कालावधी लोटला आहे. सावंतवाडी बसस्थानकाचीही तीच स्थिती आहे. २०१४ ते २०१९ या युती शासनाच्या काळात सावंतवाडी बसस्थानक इमारतीसाठी साडेचार कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यामध्ये केवळ आगाराच्या इमारतीचे काम झाले. मात्र, बसस्थानकाची इमारत जीर्णच आहे. तळेरे बसस्थानकाची इमारतही जीर्ण झाली आहे. त्यामुळे शासनाच्या या नव्या धोरणात कणकवली, सावंतवाडी आणि तळेरे या तीन बसस्थानकांचा प्राधान्याने विचार केला आहे.