पंजाबमधील 12 जिह्यांमध्ये पूर, 29 जणांचा मृत्यू
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, हरियाणा, दिल्लीसह उत्तर भारतात पाऊस सुरूच आहे. पंजाबमधील पठाणकोट, फिरोजपूरसह 12 जिल्हे एका आठवड्यापासून पुराच्या विळख्यात आहेत. राज्यातील 1,312 गावांमधील 2.56 लाखांहून अधिक लोक पुरामुळे बाधित आहेत. आतापर्यंत पंजाबमध्ये 29 जणांचा मृत्यू झाला आहे. राजधानी दिल्ली आणि उत्तराखंडमध्येही पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच शाळा-कॉलेजना सुटी जाहीर करण्यात आली आहे.
पंजाबमध्ये सध्या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे भिवानी, हिसार, सिरसा, यमुनानगर, कुरुक्षेत्र आणि पंचकुला येथील शाळा मंगळवारी बंद ठेवण्यात आल्या. गुरुग्राममध्ये कार्यालयातील कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चालू आठवड्यासाठी अनेक कार्यालयांनी ही घोषणा केली आहे. पंजाबमधील जालंधरमध्ये अनेक रस्ते पाण्याने भरले होते. जालंधर कोर्ट कॅम्पसमध्येही पाणी साचले होते. हरियाणातील फरीदाबाद येथील राष्ट्रीय महामार्गावरील वल्लभगड उ•ाणपुलाजवळ अनेक फुटांपर्यंत पाणी भरले होते. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती.
दिल्लीत यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर मंगळवारी ट्रान्स-यमुना परिसरातील अनेक वसाहतींमध्ये पाणी शिरले. यमुना बाजार, मयूर विहार आणि आसपासच्या भागातील वसाहतींमध्ये राहणाऱ्या लोकांना त्यांच्या आवश्यक वस्तूंसह मदत छावण्यांमध्ये हलविण्यात आले होते. दुसरीकडे, नोएडाच्या याकुबपूर भागात यमुना नदीची पाण्याची पातळी वाढल्यानंतर नजीकची घरे पाण्यात बुडाली आहेत. लोक सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होत आहेत. आगऱ्यात यमुनेला पुन्हा एकदा पूर आला आहे. नदीचे पाणी ताजमहालच्या पायऱ्यांपर्यंत पोहोचले होते. त्याचवेळी कैलाश घाट, बालकेश्वर घाट, हाथी घाट आणि दसरा घाटाच्या पायऱ्याही पूर्णपणे पाण्यात बुडाल्या होत्या. यमुनेची पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीपेक्षा दोन फूट वर वाहत आहे.
जम्मू-काश्मीरमधील रामबन उड्डाणपुलाला भेगा
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे जम्मू-श्रीनगर महामार्गावरील वाहनांची वाहतूक प्रभावित झाली आहे. भूस्खलन आणि ढगफुटीसदृश पावसाच्या घटनांमुळे प्रशासन सतर्क झाले आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील रामबन उ•ाणपुलाला भेगा पडल्याचे निदर्शनास आल्याने सावधगिरी बाळगली जात आहे. पावसामुळे महामार्गाच्या अनेक भागात दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. रामबन, दोडा, किश्तवाड आणि कठुआ जिह्यात सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत होता. तसेच काश्मीर खोऱ्यातही काझीगुंडसह कुलगाम आणि अनंतनागच्या वरच्या भागात मुसळधार पाऊस पडत आहे.
दिल्लीतील स्थिती ‘धोका’दायक
दिल्लीत मुसळधार पावसानंतर यमुना नदीची पाण्याची पातळी वाढली आहे. पाण्याची पातळी वाढल्यामुळे नदीच्या सभोवतालच्या सखल भागात बांधलेली घरे आणि झोपड्यांचे नुकसान झाले आहे. मजनू का टीला परिसरातील ताज्या छायाचित्रांमध्ये पुरासारखे दृश्य दिसून येत आहे. अनेक घरे पाण्याखाली गेल्यामुळे लोक चिंतेत आहेत. प्रशासनाने मदत आणि बचावकार्य सुरू करत बाधित लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला दिला आहे. पाऊस सुरूच राहिल्यास पाण्याची पातळी वाढल्यामुळे धोका आणखी वाढू शकतो.
राजस्थानातही काही भागाला तडाखा
राजस्थानमध्ये सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दौसामध्ये अनेक कालवे भरून वाहत आहेत. राज्यातील काही भागांना जोरदार तडाखा बसलेला दिसत आहे. तसेच पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे बऱ्याच ठिकाणी रस्तेही जलमय झाले आहेत. मंगळवारी दौसामध्ये सुमारे 177 मिमी पाऊस पडल्यामुळे हरिपुरा धरण ओसंडून वाहत आहे. मदत पथके सतर्क असल्याचे दौसाचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी देवेंद्र कुमार यांनी सांगितले.