कल्याणमध्ये लज्जतदार मोदकांची मेजवानी
३०हून अधिक प्रकारच्या मोदकांनी मोदकोत्सवाची रंगत वाढवली
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २ ः पारंपरिक उकडीच्या मोदकात अननस, सीताफळचे स्टफिंग, केळे व खोबरे गुळाचे मिश्रण बनवून बनवलेले मोदक, विड्याचे पान व गुलकंदाच्या फ्लेवरचा पान मसाला मोदक, मुखवास मोदक, आवळ्याचा वापर करून बनवलेले मोदक, तंदुरी मिसळ मोदक, नाचणी व सुकामेव्याचा मोदक यासह तळणीचे मोदक, विविध चाॅकेलट, सुकामेव्याचे मोदक अशा विविध प्रकारच्या ३०हून अधिक प्रकारच्या मोदकांनी मोदकोत्सवाची रंगत वाढवली.
निमित्त होते ते सुभेदारवाडा कट्टा, कल्याण विकास फाउंडेशन, दी महिला सहकारी उद्योग मंदिर यांच्या वतीने आयोजित मोदकोत्सव स्पर्धेचे. कल्याण पश्चिमेतील पारनाका येथील अभिनव विद्यामंदिरात शनिवारी हा महोत्सव पार पडला. या स्पर्धेसाठी ७८ स्पर्धकांनी सहभाग घेतला असून, त्यांनी विविध प्रकारचे मोदक सादर केले. उकडीचे मोदक आणि इतर मोदक या दोन गटांमध्ये ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेसाठी ठाणे जिल्ह्यातील व मुंबई परिसरातील स्पर्धक आलेले होते. तसेच या स्पर्धेसाठी २० वर्षे ते ७५ वर्षांपर्यंतच्या महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.
विजेत्या महिला
इतर प्रकारच्या मोदक प्रकारात महेश गोंधळी (प्रथम), रिद्धी धुमाळ (द्वितीय), निरजा राव (तृतीय) विजेते ठरले, तर वृंदा राऊत आणि शैला महाजन यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. उकडीच्या मोदक प्रकारांमध्ये भाविका गोंधळी (प्रथम), छाया रासने (द्वितीय), अनुराधा राऊत (तृतीय) विजेते ठरले. त्याचबरोबर मधुरा सावंत आणि दीपाली दळवी यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. सेलिब्रिटी शेफ तुषार देशमुख, शेफ ओंकार पोतदार आणि आहार तज्ज्ञ स्नेहा गीते यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले.
उखाणा स्पर्धा रंगतदार
त्याचबरोबर यंदा घेण्यात आलेली उखाणा स्पर्धा रंगतदार ठरली. त्यात मधुरा सावंत, अनुजा पिंपळखरे, संध्या देशमुख, शुभांगी भोसले आणि मीनल घोडके विजेते ठरले, तर वृंदा राऊत यांना उत्तेजनार्थ पारितोषिकाने गाैरवण्यात आले. पद्मा साठे आणि सुनिता मोराणकर यांनी या स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. या कार्यक्रमप्रसंगी सुभेदारवाडा कट्ट्याचे खजिनदार अर्जुन पाटील, सदस्य संजय पांडे, कल्याण विकास फाउंडेशनच्या अध्यक्षा हेमालता पवार व इतर सदस्या, दी महिला सहकारी उद्योग मंदिर मर्यादित कल्याण या संस्थेच्या अध्यक्षा मेधा आघारकर आणि त्यांचे पदाधिकारी उपस्थित होत्या. सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.