रेवतळे शाळेला संगणक प्रदान
esakal September 03, 2025 10:45 AM

रेवतळे शाळेला
संगणक प्रदान
मालवणः मराठी शाळेतील मुलांना संगणकीय शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने येथील (कै.) अरुण काशिनाथ बादेकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे रेवतळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला दोन संगणक संच भेट देण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष गणेश बादेकर, सचिव श्रीधर बादेकर, खजिनदार सौगंधराज बादेकर, राजीव बादेकर, निनाद बादेकर, ललित चव्हाण, सचिन हडकर, स्वाती मसुरकर, संध्या मेस्त्री, मुख्याध्यापक देविदास प्रभुगावकर, उपक्रमशील शिक्षक घोडगे आदी उपस्थित होते. सौगंधराज बादेकर यांनी ट्रस्टच्या उपक्रमांबद्दल माहिती दिली. मुख्याध्यापक प्रभुगावकर यांनी ट्रस्टचे आभार मानत सर्वसामान्यांना, गरीब कुटुंबियांना संगणकीय शिक्षणाचा फायदा मिळवून देण्यासाठी राबविण्यात आलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
.....................
सावंतवाडीत ८ ला
पेन्शन अदालत
सावंतवाडीः सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या व देय रकमांसंदर्भात ८ सप्टेंबरला सावंतवाडी येथे पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे. पंचायत समिती, सावंतवाडी येथे दुपारी २.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी या कार्यक्रमाची माहिती दिली. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशन सावंतवाडी अध्यक्ष दत्ताराम फटनाईक आणि महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटना सावंतवाडी अध्यक्ष लवू चव्हाण यांना पत्र पाठवून या अदालतीमध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. या पेन्शन अदालतीमध्ये, सेवानिवृत्त जिल्हा परिषद कर्मचारी आणि प्राथमिक शिक्षकांकडून त्यांच्या प्रलंबित देय रकमा आणि इतर मागण्यांबाबतची निवेदने स्वीकारली जातील. तसेच समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाईल. या पेन्शन अदालतीचा मुख्य उद्देश सेवानिवृत्त कर्मचारी आणि शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या आणि आर्थिक बाबी सोडविणे हा आहे. त्यामुळे त्यांना त्यांचे निवृत्तीनंतरचे आर्थिक लाभ वेळेवर मिळण्यास मदत होईल.
.....................
प्रवासी शेडअभावी
सावंतवाडीत गैरसोय
सावंतवाडीः ऐन गणेशोत्सवात कोकण रेल्वेची २०११२ कोकणकन्या एक्स्प्रेस रविवारी (ता. ३१) दोन तास उशिराने सावंतवाडी रेल्वेस्थानकात दाखल झाली. परिणामी शेकडो प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. सावंतवाडी रेल्वेस्थानकाचे काम अद्याप अपूर्ण असून, प्रवाशांसाठी आवश्यक शेडची सोय उपलब्ध नाही. त्यामुळे पावसात प्रवाशांना ओलेचिंब होत उभे राहावे लागले. महिलांपासून लहान मुलांपर्यंत सर्वांनाच पावसामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. गणेशोत्सवाच्या काळात कोकणात मोठ्या प्रमाणावर प्रवासी ये-जा करत असल्याने गर्दी प्रचंड वाढली आहे; मात्र गाड्यांचा विलंब आणि स्थानकावरील अपुऱ्या सुविधांमुळे प्रवाशांचा त्रास दुप्पट झाला आहे.
.....................
‘बी पॉझिटिव्ह’साठी
९ जणांचे रक्तदान
ओटवणेः गोवा-बांबोळी रुग्णालयात बायपास शस्त्रक्रियेसाठी दाखल सांगेली येथील समिधा सांगेलकर यांना तत्काळ ‘बी पॉझिटिव्ह’च्या ९ ब्लड बॅगची गरज असताना सांगेलीतील युवा विकास प्रतिष्ठान व ऑन कॉल रक्तदाते संस्थेच्या ९ नियमित रक्तदात्यांनी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जाहीर केला असतानाही धो-धो पावसात त्वरित बांबोळी गाठत तत्काळ रक्तदान केले. त्यामुळे या महिलेच्या नातेवाईकांनी या सर्व रक्तदात्यांसह युवा विकास प्रतिष्ठान व ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे आभार मानले. या महिलेसाठी नितीन राऊळ, अभिजित कविटकर, सत्यवान मेस्त्री, अमित मेस्त्री, उमा वराडकर, बबन कोचरेकर, यश कदम, मंगेश माणगावकर, पियूष सांगेलकर यांनी रक्तदान केले. नीलेश नाईक, सुहास राऊळ, सुशांत राऊळ, नरेश राऊळ या रक्तदात्यांना राखीव ठेवण्यात आले. संस्थेच्या रक्तदात्यांचा सार्थ अभिमान असल्याचे अध्यक्ष दयानंद गवस यांनी सांगितले.
....................
मतदान अधिकारी
मानधनात वाढ
कणकवलीः भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना प्रतिवर्षी देण्यात येणाऱ्या सहा हजार रुपये मानधनात वाढ केली आहे. आता हे मानधन १२ हजार रुपये एवढे केले आहे. तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक यांच्याही मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या पर्यवेक्षकांना प्रतिवर्षी १२ हजार रुपये ऐवजी १८ हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना त्यांच्या निर्धारित मतदान क्षेत्रात घरोघरी जाऊन केलेल्या प्रत्यक्ष पडताळणीसाठी एक हजार रुपयांऐवजी दोन हजार एवढे वार्षिक विशेष प्रोत्साहन मानधन देण्यात येणार आहे. वाढीव मानधन १ सप्टेंबरपासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
.......................

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.