अभियांत्रिकी
esakal September 03, 2025 11:45 AM

जागतिक अभियांत्रिकी क्षेत्राचे एएसएमई प्रथमच भारतात
मुंबई, ता. २ : द अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्स (एएसएमई) ही अभियांत्रिकीच्या विविध शाखांमध्ये सहकार्य आणि ज्ञान-विनिमयाला प्रोत्साहन देणारी आंतरराष्ट्रीय संस्था, प्रथमच भारतात जागतिक परिषद आयोजित करणार आहे. इंटरनॅशनल मेकॅनिकल इंजिनिअरिंग काँग्रेस अँड एक्स्पोझिशन हे (आयएमईसीई) हैद्राबाद इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर (एचआयसीसी) येथे १० ते १३ सप्टेंबरदरम्यान होईल, असे एएसएमई इंडिया प्रा.लि.चे संचालक मधुकर शर्मा म्हणाले.
परंपरेने अमेरिकेत आयोजित होणाऱ्या या आयएमईसीई परिषदेत जगभरातील विचारवंत, संशोधक, उद्योगतज्ज्ञ, धोरणकर्ते आणि विद्यार्थी एकत्र येतात. त्यांच्यामार्फत विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचा शोध घेतला जातो. भारतातील परिषदेत ६४० हून अधिक संशोधन निबंध व तांत्रिक सादरीकरणे होतील. यात दीड हजार प्रतिनिधी आणि शंभर प्रदर्शक सहभागी होतील. याद्वारे अभियांत्रिकी ज्ञानवृद्धी होणे, शैक्षणिक व औद्योगिक सहकार्य बळकट करणे आणि जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी नव्या उपाययोजना करणे हे हेतू साध्य होतील.
अत्याधुनिक तंत्रज्ञान व उत्पादन प्रक्रियांपासून ते यांत्रिक प्रणालींमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि रोबोटिक्सच्या एकत्रीकरणापर्यंत, शाश्वत डिझाइन पद्धतींपासून ते जागतिक सामाजिक आव्हानांना सामोरे जाण्यात यांत्रिक अभियांत्रिकीच्या भूमिकेपर्यंत विविध विषयांवर या परिषदेत चर्चा होईल. तसेच शोधनिबंध सादर होतील. या परिषदेमुळे शैक्षणिक संस्था, राष्ट्रीय संशोधन प्रयोगशाळा, उद्योग आणि शासकीय संस्था यांच्यात सहकार्याला चालना मिळेल. या परिषदेत सहभागी होण्यासाठी https://www.asme-india.org/imece/register या लिंकवर नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.