घणसोली-कोपरखैरणेतील खाऊ गल्लीला पसंती
तरुणाईसाठी आकर्षण, मात्र स्वच्छतेचा प्रश्न कायम
कोपरखैरणे, ता. २ (बातमीदार) : घणसोली व कोपरखैरणे परिसर आता केवळ निवासी व व्यापारी केंद्र म्हणूनच नव्हे, तर खवय्यांचे उत्तम ठिकाण म्हणूनही ओळखले जाऊ लागले आहे. सायंकाळी रस्त्यांच्या कडेला उभे असलेले फूड स्टॉल्स, चाट-भेळचे ठेले, डोसा-इडलीपासून मोमोज व रोल्सपर्यंतचे पर्याय तरुणाईला विशेष आकर्षित करत आहेत.
विशेष म्हणजे, कमी दरात भरपूर चव या वैशिष्ट्यांमुळे स्ट्रीट फूडला प्रचंड मागणी आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी, आयटी व कॉर्पोरेट कर्मचारी तसेच स्थानिक कुटुंबेही या खाऊ गल्लीला आकर्षित होत आहेत. संध्याकाळी घणसोली स्थानकाजवळ, कोपरखैरणे डीमार्ट परिसर, तसेच सेक्टर-५ व ९ मधील खाऊ गल्ल्यांमध्ये मोठी गर्दी दिसून येते. स्थानिकांच्या मते, या भागात काही वर्षांपूर्वी मर्यादित खाणावळी होत्या; मात्र आता जवळपास प्रत्येक गल्लीत नवे स्टॉल्स सुरू झाले असून, विविध खाद्यपदार्थांची चव येथे चाखायला मिळत आहे. चायनीज, पंजाबी, दक्षिण भारतीय, फास्ट फूड यासोबतच हेल्दी स्नॅक्स व फ्युजन डिशेस देखील आता सहज उपलब्ध होत आहेत. तथापि, स्वच्छतेचा प्रश्न अजूनही गंभीर आहे. उघड्यावर बनवल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. महापालिकेने वेळोवेळी कारवाई केली तरी काही स्टॉल्स अजूनही नियमबाह्य पद्धतीने सुरू आहेत. नागरिक आणि आरोग्य तज्ज्ञ नियमित तपासणी आणि स्वच्छतेसाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी करत आहेत.
...................
स्ट्रीट फूड कल्चरमुळे स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होत असून, यामुळे स्थानिक अर्थचक्रालाही हातभार लागतो. तरुणाईला आकर्षित करणारे चविष्ट आणि किफायतशीर पर्याय असल्याने फूड स्टॉल्सची लोकप्रियता वाढत आहे, परंतु तज्ज्ञांच्या मते, चव आणि किफायतशीर दर या जोडीला स्वच्छता आणि सुरक्षिततेकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. स्थानिक प्रशासन आणि फूड स्टॉल्सचे मालक स्वच्छतेकडे दुर्लक्ष करीत राहिले, तर पुढील काळात सार्वजनिक आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे फूड कल्चर टिकवून ठेवण्यासाठी सतत जागरूकता, नियमांचे पालन आणि पर्यावरणपूरक पद्धतीने संचालन करणे गरजेचे आहे.