सोलापूर: मुळेगाव तांडा परिसरातील स्वामी विवेकानंद नगरातील बनावट देशी-विदेशी मद्य तयार करणाऱ्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (एक्साईज) पथकाने धाड टाकली. त्याठिकाणी देशी-विदेशी दारूच्या तब्बल दहा हजार २८ बाटल्या सापडल्या. याशिवाय विविध कंपन्यांचे लेबल, बुचणे देखील आढळली. या पथकाने कारवाईत एकूण १२ लाख ७० हजार ३२० रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला खबऱ्याकडून त्या कारखान्यात मोठा मद्यसाठा असल्याची खबर मिळाली होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक ए. व्ही. घाटगे यांच्या नेतृत्वातील पथकाने ही कारवाई केली. धाड टाकली त्यावेळी बनावट पद्धतीने मद्य बाटल्यांमध्ये भरून त्याला विविध कंपन्यांचे लेबल व बुच लावले जात होते. या गुन्ह्यातील संशयित आरोपी शिशूपल धनू राठोड फरार झाला असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
ऑगस्टमध्ये ५१ लाखांची दारू जप्त
१ ते ३१ ऑगस्ट या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाने हातभट्ट्यांवर धाडी टाकल्या. याशिवाय अवैधरीत्या सोलापूर जिल्ह्यातून दारू वाहतूक करणाऱ्यांवरही कारवाई केली. या कारवाईत ६० हजार ६६० लिटर गुळमिश्रित रसायन, पाच हजार ८८० लिटर हातभट्टी, ५६० लिटर देशी-विदेशी दारू, दोन हजार लिटर बिअर व १२ वाहनांसह एकूण ५० लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.