दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत वेस्ट झोन आणि सेंट्रल झोन हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ वेस्ट झोनने गाजवला. सुरुवातीला तीन धक्के बसल्यानंतर वेस्ट झोन संघ अडचणीत आला होता. पण ऋतुराज गायकवाडने डाव सावरला आणि संघाला संकटातून बाहेर काढलं. सलामीला आलेले यशस्वी जयस्वाल आणि हार्विक देसाई हे स्वस्तात बाद झाले. संघाच्या अवघ्या 10 धावा असताना दोघं तंबूत परतले. त्यानंतर ऋतुराज गायकवाडने आर्या देसाई, श्रेयस अय्यर, शम्स मुलानी आणि तनुष कोटियन यांच्यासोबत मोर्चा सांभाळला. यावेळी ऋतुराज गायकवाडने विरोधी संघावर जोरदार प्रहार केला. त्याच्या या खेळीमुळे वेस्ट झोनचा संघ पहिल्या दिवशी मजबूत स्थितीत पोहोचला आहे. वेस्ट झोनने पहिल्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा 6 गडी बाद 363 धावा केल्या आहेत. पण असं असूनही ऋतुराज गायकवाडाचा या डावातील शेवट मनाला चटका लावणारा झाला.
ऋतुराज गायकवाडने पहिल्या 72 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर 131 चेंडूचा सामना करत शतकाला गवसणी घातली. त्याची आक्रमक खेळी सुरुच होती. त्यामुळे त्याने लवकरच 150 धावांचा टप्पाही गाठला. तसेच द्विशतकाकडे कूच केली होती. मात्र 184 धावांवर असताना ऋतुराज गायकवाड सारांश जैनच्या गोलंदाजीवर बाद झाला. सारांश जैनच्या गोलंदाजीवर पुढे येत फटका मारण्याच्या नादात चुकला आणि यष्टीरक्षक युपेंद्र यादव याने त्याला यष्टीचीत केलं. त्यामुळे त्याचं द्विशतक अवघ्या 16 धावांनी हुकलं. त्यामुळे चाहत्यांना दु:ख झालं. ऋतुराजने आपल्या खेळीत एकूण 206 चेंडूंचा सामना केला. तसेच 25 चौकार आणि 1 षटकार मारला.
ऋतुराज गायकवाडने सेंट्रल झोनच्या भेदक गोलंदाजीसमोर इतक्या धावा केल्याचं कौतुक होत आहे. सेंट्रल झोन संघातून सारांश जैनशिवाय खलील अहमद, दीपक चाहर, यश ठाकुर आणि हर्ष दुबे हे स्टार गोलंदाज आहेत. पण ऋतुराजने या सर्व गोलंदाजांचा तितक्याच ताकदीने सामना केला. सरांश जैनविरुद्ध सर्वाधिक 55 धावा आणि हर्ष दुबेविरुद्ध 48 धावा केल्या. तर इतर तीन गोलंदाजांविरुद्ध 20 पेक्षा जास्त धावा केल्या. ऋतुराजच्या या खेळीमुळे त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत संधी मिळू शकते. त्यामुळे आणखी एक फलंदाज दावेदार ठरला आहे. आता बीसीसीआय निवड समिती काय निर्णय घेईल याकडे लक्ष लागून आहे. आशिया कप स्पर्धेनंतर लगेचच या संघाची घोषणा होणार आहे.