अभियंत्याकडून लग्नाच्या भूलथापा देऊन विवाहितेवर अत्याचार
नवी मुंबई, ता. ३ (वार्ताहर) : सातारा येथे राहणाऱ्या एका २७ वर्षीय तरुणाने ३२ वर्षीय विवाहितेला लग्नाच्या भूलथापा देऊन तिच्यावर मागील दोन वर्षांपासून लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. रोहित सुनील चव्हाण असे या तरुणाचे नाव असून कळंबोली पोलिसांनी त्याच्याविरोधात लग्नाच्या भूलथापा देऊन बलात्कार तसेच धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी रोहित चव्हाण (वय २७) सिव्हिल इंजिनिअर असून तो सातारा, पाटण तालुक्यातील कोयनानगर येथे राहण्यास आहे. तर पीडित विवाहितेचे सासर सातारा येथील असून तिला सात वर्षांचा मुलगा आहे. पीडित विवाहितेचा पती दारूडा असल्यामुळे ती आपल्या मुलासह पवई येथे माहेरी राहण्यास आहे. २०२३ मध्ये पीडित विवाहिता सातारा येथे राहण्यास असताना, तिचे आरोपी रोहित चव्हाण याच्यासोबत सूत जुळले होते. त्यानंतर पीडित विवाहिता पवई येथे राहण्यास आल्यानंतर आरोपीने तिला लग्नाच्या भूलथापा देऊन तसेच तिच्या मुलाचा सांभाळ करण्याचे आश्वासन देऊन तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने पीडित विवाहितेला कळंबोली, वाशी आदी विविध ठिकाणांवरील हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. मागील दोन वर्षांपासून या दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू होते. आरोपी रोहित चव्हाण याने दोन महिन्यांपूर्वी दुसऱ्या मुलीसोबत लग्न जुळवले. याबाबतची माहिती पीडित विवाहितेला समजल्यानंतर तिने रोहितच्या होणाऱ्या पत्नीला व तिच्या आई-वडिलांना तिचे व रोहितमध्ये असलेल्या प्रेमसंबंधाची माहिती दिली. त्यामुळे रोहितचे लग्न मोडल्याने त्याचा रोहितला राग आला. त्यानंतर त्याने पीडित विवाहिता व तिच्या मुलाला जिवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडित विवाहितेने पवई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी रोहित चव्हाण याच्याविरोधात लग्नाच्या भूलथापा देऊन बलात्कार केल्याप्रमाणे तसेच धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तसेच हा गुन्हा कळंबोली पोलिसांकडे वर्ग केला. त्यानुसार आरोपी रोहित चव्हाण याला अटक करण्यात आल्याची माहिती कळंबोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी दिली. न्यायालयाने आरोपीला एक दिवसाची पोलिस कोठडी ठोठावल्याचेही कोते यांनी सांगितले.