'ते झाड 1 कोटी रुपयांचे रक्तचंदन नव्हे, तर 10 हजारांचं बीजासाल', रेल्वेच्या दाव्यानं प्रकरणाला नवं वळणं?
BBC Marathi September 05, 2025 03:45 AM
Bhagyashree Raut

एप्रिल महिन्यात मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिलेला एका आदेशाची खूप चर्चा झाली होती.

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी केशव शिंदे यांच्या शेताची जमीन रेल्वेनी संपादित केली होती. त्या शेतात एक झाड होते. ते झाड देखील या संपादित जमिनीत गेले.

तेव्हा या झाडाचाही मोबदला मिळावा म्हणून हा खटला चालवण्यात आला. हे झाड रक्तचंदनाचे आहे त्यामुळे त्याचा मोबदला 1 कोटी रुपये इतका आहे, आणि रेल्वेनी तो असा आदेश हायकोर्टाने दिला होता. त्यानंतर रेल्वेनी ती रक्कम भरली देखील.

पण आता या खटल्याला नवे वळण मिळाले आहे.

पैसे जमा केल्याच्या काही दिवसांतच हे झाड रक्तचंदनाचं नसून बिजासाल असल्याचा अर्ज रेल्वेनं मुंबई हायकोर्टाच्या नागपूर हायकोर्टात केला आहे.

मध्य रेल्वेनं यवतमाळमधील पुसद इथल्या शेतकऱ्याला दिलेले एक कोटी रुपये परत मागितले असून त्यासाठी त्यांनी अर्ज केला आहे. पण, सध्या यावर कोर्टात सुनावणी झालेली नाही.

मध्य रेल्वेची बाजू मांडणाऱ्या वकील निरजा चौबे बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाल्या, "बंगळुरूमधल्या संस्थेकडून परीक्षणाचा अहवाल आला असून ते रक्तचंदन नसून बिजासाल आहे. त्याची किंमत फक्त दहा हजार रुपये आहे. 10,000 रुपये कापून आम्हाला उरलेले पैसे परत हवे आहेत."

पण, या मूल्यांकनावर शेतकऱ्यानं शंका उपस्थित केली असून आम्हाला त्यावर विश्वास नसल्याचं म्हटलं आहे.

शेतकरी केशव शिंदे यांचा मुलगा पंजाब शिंदे म्हणाले, "आम्हाला त्यांच्या परीक्षणावर विश्वास नाही. पण, समजा ते बिजासाल होतं तर मग अधिकाऱ्यांनी 2015 पासून आम्हाला का सांगितलं नाही? त्यांनी मोबदल्याच्या अवार्डमध्ये कागदपत्रांवर हे रक्तचंदन असल्याचं का म्हटलं? तसेच आता हायकोर्टात रेल्वेनं सादर केलेल्या अर्जात त्याची किंमत फक्त दहा हजार रुपये काढली आहे. समजा हे बिजासाल जरी असेल तरी त्याचं मूल्यांकन चुकीचं झालेलं आहे. त्यांनी जप्त केलेल्या झाडानुसार मूल्यांकन केलेलं आहे."

एप्रिल महिन्यात शेतकऱ्याला रक्तचंदनाच्या झाडाचा मोबदला हायकोर्टामधून मिळाला होता. हा तात्पुरता मोबदला होता. त्यानंतर आता ऑगस्ट महिन्यात मध्य रेल्वेनं हे बिजासाल असल्याचा अर्ज कोर्टात सादर केला आहे.

'हे आता का सांगण्यात आलं?' वकिलांचा सवाल

एप्रिल महिन्यात हायकोर्टानं या झाडाचं मूल्यांकन करण्याचे आदेश सुद्धा संबंधित वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानंतर पुसद वनविभागाच्या उपवनसंरक्षकानं बंगळुरूमधील लाकूड विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेला मूल्यांकन करण्याचं काम दिलं. यामध्ये हे रक्तचंदन नसून बिजासाल असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्याचं शास्त्रीय नाव हे टेरोकॉर्पस मार्सुपिअम (Pterocarpus Marsupium) असल्याचं त्या अहवालात नमूद आहे.

याच अहवालाच्या आधारे मध्य रेल्वेनं कोर्टात धाव घेतली असून या झाडाचं मूल्यांकन फक्त दहा हजार रुपये असल्याचं म्हटलं आहे.

पण, "हायकोर्टानं फक्त मूल्यांकन करायचे आदेश दिले होते, झाड कुठलं आहे याचं परीक्षण करण्याचे आदेश दिले नव्हते. त्या संस्थेच्या अहवालानुसार हे बिजासाल असेल तरी हे रक्तचंदन असल्याचं आतापर्यंत अधिकारी का सांगत होते? त्यांनी अवार्डमध्ये रक्तचंदन का म्हटलं होतं? तसेच याआधी झाडांच्या इतर प्रकरणात कोर्टानं भरपूर मोबदला दिला. कडूलिंबाच्या झाडासाठी सुद्धा खूप मोबदला देण्याचे आदेश कोर्टानं याआधी दिले होते. आता फक्त दहा हजार रुपये मूल्यांकन का काढलं जातंय? झाडाचं मूल्यांकन जास्त असून आम्ही त्यासाठी हायकोर्टात उत्तर देखील दाखल केलं आहे, असं शेतकऱ्याच्या वकील अॅड अंजना राऊत यांनी सांगितलं.

मध्य रेल्वेच्या वकील निरजा चौबे म्हणाल्या, "मूल्यांकन करणं हे रेल्वेचं काम नाही. तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांनी त्याचं मूल्यांकन करायला पाहिजे होते. अवार्डमध्ये हे रक्तचंदन असल्याचं त्यांनी लिहिलेलं आहे."

यामध्ये 2015 पासून तर 2025 पर्यंत वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह सगळ्यांनी हे झाड रक्तचंदनाचं आहे असंच मानलं होतं. अवार्डमध्ये पण रक्तचंदनाचं झाड असल्याचं लिहिलं गेलं. पण, कोणीही झाडाची आधीच चाचणी किंवा परीक्षण केलं नाही.

अधिकाऱ्यांनी अवार्डमध्ये रक्तचंदन असल्याचं लिहिलं असल्यानं त्याआधारे कोर्टात खटला लढला गेला. त्याआधारेच कोर्टानंही मोबदल्याचे आदेश दिले. आता मोबदला मिळाल्यानंतर या झाडाचं मूल्यांकन अधिकाऱ्यांनी केलं आणि हे बिजासाल असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आता यावर हायकोर्टात सुनावणी सुरू झाल्यानंतर कोर्ट नेमकं काय म्हणतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.

वनस्पतीशास्त्राचे अभ्यासक काय म्हणतात?

शेतकरी केशव शिंदे यांच्या शेतातील झाड खरंच रक्तचंदन आहे का? रक्तचंदन आणि बिजासालमध्ये नेमका काय फरक असतो? याबद्दल जाणून घेण्यासाठी आम्ही नागपूर विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. नितीन डोंगरवार यांना झाडाचे फोटो पाठवले.

BBC शिंदे यांच्या शेतातील झाडाच्या फांदीचा फोटो

डोंगरवार यांनी सांगितलं की "टेरोकॉर्पस मार्सुपिअम (Pterocarpus Marsupium) हे बिजासालचं शास्त्रीय नाव आहे, तर टेरोकॉर्पस सँटालिनस ( Pterocarpus Santalinus) हे रक्तचंदनाचं शास्त्रीय नाव आहे. हे दोन्ही एकाच फॅमिलीतील आहेत. पण, दोन्ही झाडांमध्ये फरक आहे. बिजासालाचे पानं थोडेसे टोकदार आणि निमूळते असतात आणि रक्तचंदनाची पानं हे थोडे गोलाकार असतात. शेतकऱ्याच्या शेतातील झाडाचे, पानांचे फोटो पाहून हे बिजासाल आहे असं दिसतंय."

तसेच वरोऱ्यातील आनंद निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य आणि वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक मृणाल सांगतात "रक्तचंदनाच्या फांदीच्या एका बाजूला तीन पानं असतात, तर बिजासालला सात पानं असतात. या फोटोंमध्ये सात पानांचा ग्रुप दिसतोय."

An Excursion Flora of Central Tamilnadu या पुस्तकात याबद्दल सविस्तर माहिती दिली असल्याचंही त्यांनी सांगितलं.

नेमकं प्रकरण काय?

यवतमाळ जिल्ह्यातील खरशी इथले शेतकरी केशव शिंदे आणि त्यांच्या पाच मुलांनी हायकोर्टात रक्तचंदनाच्या झाडाच्या मोबदल्यासाठी 7 ऑक्टोबर 2024 ला याचिका दाखल केली होती.

केशव शिंदे याची पुसद तालुक्यातल्या खरशी गावात 2.29 हेक्टर जमीन आहे. पण, वर्धा-यवतमाळ-पुसद-नांदेड अशी रेल्वे लाईन त्यांच्या शेतातून जात असल्यानं मध्य रेल्वेनं त्यांची जमीन संपादित केली.

Getty Images

त्यांना संपादीत जमिनीचा मोबदला मिळाला. शिंदे यांनी शेतात उभं असलेलं रक्तचंदनाचं झाड, तसेच येनाचं झाडं, खैर यासारखे आडजातीचे आठ-दहा झाडं आणि भूमिगत पाईपलाईन याच्या मोबदल्याचीही मागणी भूसंपादन अधिकाऱ्यांकडे केली.

पण, रक्तचंदनाच्या झाडाचं आधी मूल्यांकन करायला लागेल असं त्यांचं म्हणणं होतं. मूल्यांकन करण्यासाठी वनविभागालाही पत्र देण्यात आलं.

BBC केशव शिंदे आणि पंजाब शिंदे

केशव शिंदे यांचा मुलगा आणि याचिकाकर्ते पंजाब शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या शेतजमिनीवर आंब्यासह इतर फळबाग होती. त्याचा मोबदला मिळाला होता.

विहीरीचाही आठ लाख रुपये मोबदला मिळाला. पण, रक्तचंदनाच्या झाडासह पाईपलाईन आणि इतर झाडांचा मोबदला मिळाला नव्हता. त्यासाठी 2014 पासून जिल्हाधिकारी, वनविभाग, रेल्वे, सिंचन विभाग सगळ्यांना पत्र व्यवहार केला. पण, आम्हाला मोबदला मिळाला नाही. त्यामुळे मग आम्ही आठ वर्षानंतर हायकोर्टात धाव घेतली.

आधी मूल्यांकन कसे करण्यात आले होते?

एकच वर्षात शिंदे कुटुंबीयांनी हा खटला जिंकला असून त्यांना मोबदला मिळाला होता. पण, या रक्तचंदनाच्या झाडाचं मूल्यांकन अजून झालेलं नाही. मूल्यांकनाच्या आधी 1 कोटी रुपये मोबदला देण्याचे आदेश हायकोर्टानं रेल्वेला दिले.

त्यानुसार रेल्वेनं 1 कोटी रुपये हायकोर्टात जमा केले. पण, मूल्यांकन झाल्यानंतर ही किंमत जवळपास 5 कोटी रुपये होऊ शकते, असं याचिकाकर्त्याच्या वकिल अंजना राऊत नरवडे यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना त्यावेळी सांगितलं होतं.

रक्तचंदनाच्या झाडाचं मूल्यांकन करण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह इतरांची एक समिती बसणार आहे. त्यानंतर उभ्या झाडाचं मूल्यांकन कसं करायचं हे ठरवलं जाईल. त्यानंतर त्याचे जे पैसे होतील ते याचिकाकर्त्यांना देण्यात येणार आहेत, असं त्यावेळी ठरलं होतं.

आता नवीन दाव्यानंतर रेल्वेनी म्हटले आहे की 10,000 रुपये कापून उर्वरित रक्कम परत करावी.

iStock

रेल्वेनं देखील मूल्यांकनामुळेच मोबदला दिला नव्हता, असं या प्रकरणात रेल्वेची बाजू मांडणाऱ्या वकील निरजा चौबे यां सांगितलं होतं.

त्यावेळी बीबीसी मराठीसोबत बोलताना त्या म्हणाल्या, होत्या "मूल्यांकन झाल्याशिवाय मोबदला कसा द्यायचा आणि उभ्या झाडाचं मूल्यांकन कसं करायचं हा प्रश्न होता. त्यामुळे रेल्वेनं मोबदला दिला नव्हता. आता हायकोर्टानं आदेश दिल्यानंतर रेल्वेनं सध्या 1 कोटी रुपये हायकोर्टात जमा केले आहेत. हे एक कोटी रुपये फक्त रक्तचंदनाच्या झाडाचा मोबदला आहे."

शिंदे यांनी आंध्र प्रदेशातून रक्तचंदनाच्या झाडाचे रेट मागवले. तसेच खासगी इंजिनिअरकडून देखील या रक्तचंदनाच्या झाडाचं मूल्यांकन केले आहे. त्यानुसार त्यांनी 4 कोटी 94 लाख रुपये किंमत काढली. तसेच या जमिनीसाठी जेव्हा अवार्ड झाला तेव्हापासूनच व्याज देखील मिळावं, अशी पण याचिकाकर्ते शिंदेंची मागणी असल्याचं त्यांनी सांगितलं.

भूमिगत पाईपलाईन आणि इतर झाडांबद्दलचं प्रकरण अजूनही प्रलंबित आहे. त्याचाही मोबदला द्यावा अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे.

शिंदे कुटुंबीयांना कुणी सांगितलं होतं हे झाड रक्तचंदनाचे आहे?

केशव शिंदे यांचं वय 94 वर्षं आहे, तर त्यांची मुलं देखील पन्नाशीच्या वर आहेत. मुलांच्या सहाय्यानं त्यांनी हा खटला लढला. शिंदे यांच्या शेतात रेल्वे स्थानक होणार असल्यानं त्यांची जास्त जमीन संपादीत झाली.

त्यांच्या जमिनीवर आंब्यासह इतर फळबागा होत्या. पण, आपल्या जमिनीवर रक्तचंदनाचं झाड आहे हे त्यांना माहितीच नव्हतं. पण, ज्यावेळी त्यांची जमीन वर्धा-यवतमाळ-पुसद-नांदेड रेल्वे लाईनसाठी संपादीत झाली तेव्हाच त्यांना समजलं की हे रक्तचंदन आहे. त्यासाठीही रेल्वेची मदत झाली.

पंजाब शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जमीन संपादीत होण्याआधी या जमिनीचं सर्वेक्षण करायला रेल्वेचे काही कर्मचारी आले होते. ते कर्मचारी आंध्र प्रदेशातले मूळचे होते. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, रक्तचंदनाचं झाड आहे.

Bhagyashree Raut

सगळी झाडं गेली तर चालतील. पण रक्तचंदनाचं झाड महाग असतं. त्यानंतर आपल्या शेतात हे रक्तचंदनाचं झाड खरंच आहे का यावर शिंदे कुटुंबीयांचा विश्वास बसत नव्हता. त्यांनी युट्युबच्या माध्यमातून हे झाडं कसं असतं? याची तपासणी केली.

तसेच आणखी जाणकार लोकांकडून चौकशी केली तेव्हा हे झाड रक्तचंदनाचं असल्याचं समजलं. त्यामुळे जमीन संपादीत झाली, तेव्हा त्यांनी रक्तचंदनाच्या झाडाचा मोबदला आम्हाला देण्यात यावा अशी मागणी भूसंपादन अधिकाऱ्यांकडे केली. पण, त्यावर कुठलीही कारवाई न झाल्यानं त्यांनी हायकोर्टात धाव घेतली.

Getty Images प्रातिनिधिक फोटो

आता हायकोर्टाच्या आदेशानंतर त्यांना सध्या एक कोटी रुपयांचा मोबदला मिळाला आहे. त्यापैकी फक्त 50 लाख काढण्याचे आदेश हायकोर्टानं दिले आहेत. सोबतच या झाडाचं मूल्यांकन करण्याचे आदेश सुद्धा दिले आहेत. मूल्यांकन झाल्यानंतर एका रक्तचंदनाच्या झाडाची किंमत किती होते त्यानुसार शिंदे कुटुंबीयांना मोबदला मिळणार आहे.

एका झाडासाठी एक कोटी मिळाल्यानंतर शेतकरी काय म्हणाले होते?

हायकोर्टाचा आदेश आल्यानंतर याचिकाकर्ते पंजाब शिंदे बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाले "मोबदला पाहिजे होता तसा मिळाला नाही. पण, माननीय कोर्टाच्या आदेशानंतर मूल्यांकन होऊन आम्हाला योग्य मोबदला मिळेल अशी आशा आहे. आम्हाला त्यावेळी झालेल्या अवार्डनुसार मोबदला मिळावा अशीच आमची मागणी आहे."

पंजाब शिंदे सार्वजनिक बांधकाम विभागात कर्मचारी होते. पण, निवृत्त झाल्यानंतर जो पैसा मिळाला तो सगळा पैसा या प्रकरणात मोबदला मिळवण्यासाठी गेल्याचंही ते सांगतात.

सध्या रक्तचंदनाचं झाड शिंदेंच्या शेतात उभंच आहे. तसेच रेल्वेलाईनचं काम प्रगतीपथावर असून हायकोर्टात प्रकरण असल्यानं शिंदे यांच्या शेतातलं काम बाकी आहे.

रक्तचंदन नेमकं काय असतं आणि इतकं मौल्यवान का?

रक्तचंदनाची झाडं ही मुख्यतः आंध्र प्रदेशच्या तामिळनाडूला लागून असलेल्या चित्तूर, कडप्पा, कुरनूल आणि नेल्लोर या चार जिल्ह्यांत पसरलेल्या शेषाचलमच्या पर्वतरांगांमध्ये आढळतात.

जवळपास पाच लाख स्क्वेअर हेक्टरच्या परिसरात पसलेल्या जंगलात आढळणाऱ्या रक्तचंदनाच्या झाडाची सरासरी उंची ही आठ ते अकरा मीटर असते. हे झाड सावकाश वाढतं, त्यामुळे त्याच्या लाकडाची घनताही अधिक असते.

ANI रक्तचंदन

तज्ज्ञ सांगतात की, लाल चंदनाचं लाकूड हे इतर लाकडांपेक्षा अधिक वेगानं पाण्यात बुडतं, कारण त्याची घनता पाण्यापेक्षा जास्त असते. हीच खऱ्या रक्तचंदनाची ओळख असते.

चीन, जपान, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, संयुक्त अरब अमीरात या देशांमध्ये रक्तचंदनाला अधिक मागणी आहे. चीनमध्ये याची सर्वाधिक मागणी आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

  • मिशी कापली म्हणून कुटुंबाला जातपंचायतीकडून 11 लाखांचा दंड, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
  • भारतातील शेतकरी दिवसेंदिवस गरीब होत चाललेत का?
  • कृषी कायदे कोणाच्या फायद्याचे आणि कुणाचं नुकसान?
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.