फॅशन आणि सौंदर्य जगात दररोज नवनवीन ट्रेंड्स येत असतात. तुम्ही आतापर्यंत ओठांचे किंवा चेहऱ्याचे फिलर्स ऐकले असतील, पण दक्षिण कोरियामध्ये (South Korea) सध्या एक वेगळाच ट्रेंड चर्चेत आहे. हा ट्रेंड आहे ’90-डिग्री शोल्डर’ लुकचा. के-पॉप (K-pop) कलाकारांपासून प्रेरणा घेऊन अनेक महिला या ट्रेंडसाठी खांद्यांमध्ये फिलर इंजेक्शन घेत आहेत. या ट्रेंडबद्दल आणि त्यामागच्या वादविवादाबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
एका कोरियन मनोरंजन वेबसाइटच्या अहवालानुसार, दक्षिण कोरियामध्ये ’90-डिग्री अँगल शोल्डर लुक’ नावाचा एक नवीन प्लास्टिक सर्जरी ट्रेंड लोकप्रिय होत आहे. के-पॉप सेलिब्रिटींप्रमाणे सरळ आणि आकर्षक खांदे मिळवण्यासाठी अनेक महिला ‘शोल्डर फिलर’ इंजेक्शन घेत आहेत. या इंजेक्शनमध्ये ट्रॅपेझियस नावाच्या स्नायूचा आकार कमी केला जातो, ज्यामुळे खांदे 90-डिग्रीच्या कोनात दिसतात. हा ट्रेंड फक्त महिलांमध्येच नाही, तर पुरुषही आपल्या आवडत्या सेलिब्रिटींसारखी शरीरयष्टी मिळवण्यासाठी या सर्जरीचा आधार घेत आहेत.
हा ट्रेंड बिग बॅंगचा जी-ड्रॅगन, ब्लॅकपिंकची जेनी आणि एस्पाची निंगनिंग यांसारख्या के-पॉप सेलिब्रिटींच्या सरळ आणि आकर्षक खांद्यांवरून सुरू झाला आहे. कोरियन सौंदर्यशास्त्रानुसार, खांदे आणि मानेच्या मधला भाग सरळ आणि टोकदार दिसणे हे खूप आकर्षक मानले जाते, ज्यामुळे चेहरा लहान आणि मान लांब दिसते.
सोशल मीडियावर या ट्रेंडला जोरदार विरोधही होत आहे. अनेक लोकांचे म्हणणे आहे की:
1. नैसर्गिक उपाय: योग्य व्यायाम आणि चांगल्या शारीरिक स्थितीमुळे देखील असे खांदे मिळवता येतात. त्यासाठी महागड्या आणि धोकादायक इंजेक्शनची गरज नाही.
2. आरोग्याचे धोके: तज्ज्ञांनीही चेतावणी दिली आहे की, अशा कॉस्मेटिक ट्रेंड्सचा वारंवार अवलंब करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे प्लास्टिक सर्जरीचे व्यसन (addiction) वाढू शकते.
3. अनोळखी धोका: इंस्टाग्रामवरील एका व्हायरल व्हिडिओवर युजरने कमेंट केली की, “जर हे फिलर पसरले, तर ते स्नायू आणि हातांपर्यंत पोहोचू शकतात.” यामुळे गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.
हा ट्रेंड सध्या फॅशन आणि सोशल मीडियाच्या जगात लोकप्रिय असला तरी, याचे आरोग्य आणि सामाजिक परिणाम गंभीर असू शकतात. सौंदर्य आणि आरोग्याचा समतोल राखणे नेहमीच महत्त्वाचे आहे.