संसद क्रीडा महोत्सवाचे आयोजन
जोगेश्वरी, ता. ४ (बातमीदार) ः भारताला क्रीडा क्षेत्रात महासत्ता बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ मध्ये सुरू केलेल्या ‘फिट इंडिया’ चळवळीच्या पार्श्वभूमीवर, मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार रवींद्र दत्ताराम वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘संसद क्रीडा महोत्सव २०२५’ चे आयोजन करण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत करण्यात आली. प्रख्यात हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त या महोत्सवाचे आयोजन होणार आहे.
या उपक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये क्रीडाप्रति जागरूकता निर्माण करणे, युवक-युवतींना खेळासाठी प्रोत्साहन देणे आणि त्यातून एक आरोग्यदायी समाजाची घडण करणे हा आहे.
खासदार वायकर यांनी सांगितले की, लोकसभा क्षेत्रातील तालुका स्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन केले जाईल. यामध्ये खो-खो, कबड्डी, फुटबॉल, योगा, क्रिकेट, स्विमिंग यांसारख्या लोकप्रिय व पारंपरिक खेळांचा समावेश असणार आहे. या महोत्सवामुळे परिसरातील तरुण खेळाडूंना आपली कौशल्ये सादर करण्यासाठी मोठे व्यासपीठ मिळणार आहे. या उपक्रमातून उद्याचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडतील आणि भारताच्या क्रीडा सामर्थ्याला अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास खासदार वायकर यांनी व्यक्त केले.